वृत्तसंस्था, सिंगापूर
भारतीय आव्हानवीर दोम्माराजू गुकेशने बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वांत युवा जगज्जेता बनण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे. गेले सलग सात डाव बरोबरीत सुटल्यानंतर अखेर गुकेशच्या प्रयत्नांना यश आले आणि त्याने जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीच्या रविवारी झालेल्या ११व्या डावात विद्यामान जगज्जेत्या चीनच्या डिंग लिरेनवर मात केली.
जगज्जेतेपदाच्या लढतीत आता केवळ तीन डाव शिल्लक असून गुकेशने प्रथमच आघाडी मिळवली आहे. गुणांच्या बाबतीत गुकेश आता ६-५ असा पुढे आहे. तो जेतेपदापासून केवळ १.५ गुण दूर असल्याने उर्वरित तीनही डावांत त्याला बरोबरी पुरेशी ठरणार आहे. आतापर्यंत सर्वच डावांत बचावात्मक खेळ करणाऱ्या डिंगला तीनपैकी किमान एक डाव जिंकावा लागणार आहे.
डिंगसाठी सकारात्मक बाब म्हणजे त्याने गेल्या जगज्जेतेपदाच्या लढतीत इयन नेपोम्नियाशीविरुद्ध १२व्या डावात विजय मिळवला होता. त्यातच त्याला दोन वेळा पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळण्याची संधीही मिळणार आहे. याचा तो फायदा करून घेतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
यंदाच्या लढतीत पहिले तीनपैकी दोन डाव निकाली झाले होते. त्यानंतर सलग सात डाव बरोबरीत सुटले. परंतु ११व्या डावात गुकेशला सकारात्मक निकाल मिळवण्यात यश आलेच.
गुकेशने पहिलीच अश्वाची चाल खेळून डिंगला गोंधळात टाकले. पाच चालींनंतर डिंगच्या तुलनेत गुकेशकडे तासभर अधिक शिल्लक होता. गुकेश वरचष्मा मिळवणार असे वाटत असताना डिंगने पुनरागमन केले. त्यामुळे गुकेशला ११व्या चालीपूर्वी ५० मिनिटांहून अधिक वेळ विचार करावा लागला. त्यानंतर वेळेचे गणित साधणे दोघांनाही अवघड जात होते.
पहिल्या टप्प्यातील ४० चाली रचण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ दिला जातो. यापैकी अखेरच्या १६ चालींसाठी डिंगकडे केवळ आठ मिनिटांचा, तर गुकेशने १५ चालींसाठी १५ मिनिटांचा वेळ शिल्लक होता. गुकेशने आपल्या वजिराजवळील प्याद्याचा बळी देत हत्तींच्या चालीसाठी अधिक जागा तयार केली. यामुळे डिंग दडपणाखाली आला. त्याने २९व्या चालीत आपला घोडा गमावला आणि हार मान्य केली.
हेही वाचा >>>VIDEO: सिराज आणि हेडमध्ये नेमकं काय बोलणं झालं? सिराजने भांडण मिटवलं का? त्यावर हेड काय म्हणाला?
दोन्ही बाजूंच्या चुकांमुळे चित्तथरारक झालेल्या अकराव्या डावातील जगज्जेत्या डिंग लिरेनवरील विजयामुळे गुकेशने जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत प्रथमच आघाडी घेतली आहे. पहिल्या पाच खेळ्यांसाठी तब्बल एक तास घेणारा जगज्जेता आणि नंतर एका खेळीसाठी ५० मिनिटे घेणारा आव्हानवीर यांच्यातील हा डाव कमालीचा चुरशीचा झाला. गुकेशचा तमिळनाडू संघातील सहकारी ग्रँडमास्टर आधिबान याच्याविरुद्ध चार वर्षांपूर्वी डिंगने विजय मिळवला होता. गुकेशने तीच सुरुवात करून डिंगला गोंधळात टाकले. मात्र, आधिबानने न केलेली चूक करून गुकेश स्वत:च अडचणी सापडला. परंतु डिंगने उंट चुकीच्या प्रकारे हलवून आपला वरचष्मा घालवला. वेळेअभावी भरभर खेळताना एका मोठ्या चुकीमुळे जगज्जेत्याने २९व्या खेळीला आपला घोडा गमावला आणि तात्काळ शरणागती पत्करली. – रघुनंदन गोखले, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते बुद्धिबळ प्रशिक्षक.