अमित कुमारपाठोपाठ बजरंगने जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत पदकाची कमाई करत भारताचा झेंडा अभिमानाने फडकवला. ६० किलो वजनी फ्रीस्टाइल गटात मंगोलियाच्या न्याम ओचिर इनखिसैखानवर ९-२ अशी मात करत बजरंगने कांस्यपदकावर नाव कोरले. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या गटात भारताला दोन पदके मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. मंगळवारी पहिल्या लढतीत बजरंगला बल्गेरियाच्या व्लादिमीर दुबोव्हकडून ०-७ अशा पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र रिपीचेज फेरीत बजरंगने जपानच्या शोगो माइडाला नमवले आणि कांस्यपदकासाठीच्या लढतीत न्यामवर विजय मिळवला. बजरंग याने एप्रिलमध्ये झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता योगेश्वर दत्त हा गुडघ्याच्या दुखापतीमुळे या स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही. त्याच्या जागी बजरंगला सहभागी होण्याची संधी मिळाली. त्याने या संधीचे सोने करत पदकावर नाव कोरले.
दरम्यान पवन कुमार आणि हितेंदर या कुस्तीपटूंना मात्र पराभवाला सामोरे जावे लागले आणि स्पर्धेतील त्यांचे आव्हान संपुष्टात आले.
हितेंदर याला दुसऱ्या फेरीत जॉर्जियाच्या गेनो पेत्रीश्वेली याने ८-० असे एकतर्फी लढतीनंतर पराभूत केले. पवनकुमार यालाही दुसऱ्या फेरीत पराभूत व्हावे लागले. चीनच्या फेंग झांग याने चुरशीच्या लढतीनंतर त्याचा ९-८ असा पराभव केला.
पवन याने लढत गमावली, तरी त्याने चीनच्या खेळाडूला दिलेली झुंज कौतुकास्पद होती. ०-४ अशा पिछाडीवरून त्याने तीन गुणांची कमाई केली. शेवटच्या मिनिटाला ५-९ अशी पिछाडी असतानाही त्याने चांगला डाव करीत तीन गुण वसूल केले मात्र बरोबरी करण्यात त्याला अपयश आले.

Story img Loader