आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) १ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमुळे कसोटी क्रिकेटला नवचैतन्य मिळून त्यामधील स्पर्धा अधिक तीव्र होईल, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने सोमवारी व्यक्त केली.

‘‘जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची आम्ही सर्व आतुरतेने वाट पाहत आहोत. त्यामुळे कसोटी क्रिकेटला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होईल,’’ असे कोहली म्हणाला.

‘‘कसोटी हे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांतील सवरेत्कृष्ट क्रिकेट आहे. कसोटीत धावा केल्यास कोणत्याही फलंदाजाला अधिक समाधान लाभते. गेल्या काही वर्षांत भारताने कसोटी सामन्यांत चमकदार कामगिरी केली असून जागतिक अजिंक्यपद जिंकण्यासाठीसुद्धा आम्ही सर्वस्व पणाला लावू,’’ असे कोहलीने सांगितले. वेस्ट इंडिजविरुद्ध २२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेद्वारे भारताचे जागतिक अजिंक्यपदाचे अभियान सुरू होणार आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे स्वरूप

* ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात १ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या अ‍ॅशेस मालिकेपासून पुढील दोन वर्षांतील सर्व कसोटी मालिका या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असणार आहेत.

* भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि श्रीलंका अशा ३१ मार्च, २०१८ रोजी जागतिक क्रमवारीत पहिल्या नऊ स्थानांवर असलेल्या संघांचा समावेश.

* तब्बल २७ मालिकेतील ७१ सामन्यांनंतर दोन अव्वल संघांमध्ये इंग्लंड येथे जून २०२१मध्ये अंतिम सामना.

* प्रत्येक संघाच्या वाटय़ाला एकूण सहा कसोटी मालिका.

* सहा मालिकांपैकी मायदेशात व प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात प्रत्येकी तीन मालिका.

* प्रत्येक विजय, बरोबरी व अनिर्णित सामन्याचे गुण मिळणार, मात्र पराभूत संघाला गुण दिले जाणार नाहीत.

कसोटी हेच अव्वल दर्जाचे क्रिकेट आहे. आजही अनेक खेळाडूंना फक्त कसोटी सामने खेळण्याची इच्छा असून जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमुळे पुन्हा एकदा मोठय़ा प्रमाणात चाहते कसोटी सामन्यांकडे वळतील.

– जेम्स अँडरसन, इंग्लंडचा गोलंदाज

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा हे ‘आयसीसी’ने उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे. कसोटी सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळणे, यापेक्षा खेळाडूसाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट असू शकत नाही. ऑस्ट्रेलियात आम्हाला कसोटी सामन्यांसाठी चाहत्यांचा मोठय़ा प्रमाणावर पाठिंबाही लाभतो.

– टिम पेन, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार

Story img Loader