अखेर जगज्जेत्या डिंग लिरेनचा अभेद्या समजला जाणारा बचाव गुकेशने भेदला आणि जगाला बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वांत तरुण जगज्जेता मिळाला! आतापर्यंत प्रौढांनाही लाजवेल इतक्या दृढतेने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणाऱ्या गुकेशचा बांध डिंग शरण आल्यावर फुटला आणि पटावर बसल्याबसल्या या युवकाने आपल्या आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी दोम्माराजू गुकेशच्या गळ्यात विजयश्रीने माळ घातली आणि दोन आठवडे सतत वरखाली होणाऱ्या पटावरील नाट्याचा निकाल भारतीयांच्या बाजूने लागला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”

बुद्धिबळातील चीनच्या वर्चस्वाला गुकेशच्या भारतीय संघाने बुडापेस्टमधील ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक मिळवून हादरवले होते, पण वरकरणी अननुभवी गुकेशकडून चीनचे जगज्जेतेपद हिरावून घेतले जाईल याची त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल. अखेरच्या पारंपरिक डावाचे वैशिष्ट्य म्हणजे डिंगला लवकर बरोबरी घेण्याची घाई झाली होती. त्याचे लक्ष जलदगतीने होणाऱ्या ‘टायब्रेकर’कडे लागले होते. बुद्धिबळाच्या या प्रकारातील जागतिक क्रमवारीत ४६व्या स्थानावर असणारा गुकेश क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या डिंगसमोर किती टिकाव धरेल याची कोणालाच खात्री नव्हती. त्यामुळे गुकेशने बरोबरीसाठी वारंवार सहज वाटणाऱ्या परिस्थितीतही डिंगसमोर अडचणींचे डोंगर उभारण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. नैराश्यग्रस्त डिंग अखेर कोलमडला आणि त्याने ५५व्या खेळीत घोडचूक केली. नेहमी मख्ख चेहऱ्याने खेळणाऱ्या गुकेशचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना आणि त्याच्या चेहेऱ्यावर पुसट हसू उमटले. डिंगलाही आपल्या हातून घडलेल्या प्रमादांची जाणीव झाली, पण वेळ निघून गेली होती. नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गुकेशने देवाचे, आपल्या कुटुंबाचे आणि त्याचे ग्रँडमास्टर सहकारी हरिकृष्णा, वोजतासेक, किमर आणि मुख्य प्रशिक्षक गाजेव्स्की यांचे आभार मानले. त्याचा मानसतज्ज्ञ सहकारी पॅडी अप्टन जातीने हजर होताच! भारतात जन्मलेल्या बुद्धिबळाला परत भारतात सोन्याचे दिवस आणण्याची कामगिरी गुकेशच्या या विजयाने केलेली आहे.

(लेखक द्रोणाचार्य पुरस्कार विजेते बुद्धिबळ प्रशिक्षक आहेत.)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World chess championship 2024 d gukesh become youngest world chess champion loksatta article css