बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीत खेळाडूंवर इतके मानसिक दडपण असते की त्यांचे आयुष्य १० वर्षांनी कमी होते, असे माजी जगज्जेता मिखाईल बॉटविनिक म्हणत असे. गेल्या वर्षी कझाकस्तानची राजधानी अस्तानामध्ये रशियाचा इयान नेपोम्नियाशीविरुद्ध अतिशय चुरशीच्या झालेल्या लढतीत अखेरच्या घटकेला विजय मिळवलेल्या चीनच्या डिंग लिरेनला हा अनुभव येत आहे. त्या ताणामधून दीड वर्षांनंतरही डिंग बाहेर पडलेला नाही. या उलट आव्हानवीर दोम्माराजू गुकेश मात्र ताजातवाना दिसतो आहेॉ

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोन दिवसांत (२५ नोव्हेंबर) सिंगापूरमधील निसर्गरम्य सेंटोसा बेटावर लढतीतील पहिला डाव सुरू होईल आणि भारत-चीन या दोन देशांमध्ये आणखी एका पातळीवर स्पर्धा सुरू होईल. आतापर्यंत गुकेशला डिंग लिरेनविरुद्ध एकदाही विजय मिळवता आलेला नाही. पण १९७२ सालच्या जगज्जेतेपदाच्या सामन्यापर्यंत बॉबी फिशरला विश्वविजेत्या बोरिस स्पास्कीविरुद्ध यशाचा कवडसासुद्धा कुठे दिसला होता? स्पास्कीकडून सतत मार खाणाऱ्या फिशरने याच प्रतिस्पर्ध्यावर रोमहर्षक विजय मिळवून नवीन युगाची सुरुवात केली होती. जगज्जेता जोस राउल कॅपाब्लांका तर १९२७ साली आव्हानवीर अलेक्झांडर आलेखाईनकडून विश्वविजेतेपद गमावावे लागेपर्यंत कायम जिंकत असे आणि त्यामुळे त्याने अति-आत्मविश्वासापायी जराही तयारी केली नव्हती.

हेही वाचा – IND vs AUS: जसप्रीत बुमराहचा पर्थ कसोटीत दुर्मिळ विक्रम, कसोटीत ‘ही’ कामगिरी करणारा जगातील दुसरा तर भारताचा पहिला गोलंदाज

लय गमावलेला डिंग…

अप्रतिम बचाव आणि प्रतिहल्ला यांचे प्रात्यक्षिक दाखवत डिंग लिरेनने गेल्या वर्षी नेपोम्नियाशीला पराभूत केले, पण त्याची जबर किंमत त्याला द्यावी लागली. डिंग जरूर विश्वविजेता झाला, पण त्याला मॅग्नस कार्लसनप्रमाणे एकतर्फी विजय नोंदवता आला नव्हता. मनातून तो मॅग्नसशी बरोबरी करत असणार आणि त्याला कारणही तसेच होते. मॅग्नसला त्याने जलदगती आणि विद्याुतगती क्रमवारीत मागे टाकले होते. तब्बल ९५ डाव अपराजित राहण्याचा पराक्रमही त्याने केला होता. तरीही डिंगला निराशेने ग्रासले आणि बुद्धिबळ खेळणेसुद्धा त्याला जड झाले होते. जगज्जेता झाल्यावर त्याचा खेळ सुमार दर्जाचा होऊ लागला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘‘नैराश्यग्रस्त झाल्यामुळे माझ्या झोपेवर परिणाम झाला आहे. गुकेशकडून वाईट पद्धतीने हरण्याची मला भीती वाटते,’’ असे डिंग म्हणाला होता. एका चिनी जगज्जेत्याकडून अशी भाषा? ती पण एका १८ वर्षीय अननुभवी भारतीयाविरुद्ध? डिंगची ही भावना खरी आहे की गुकेशला बेसावध ठेवायचा डाव?

गुकेशची अप्रतिम कामगिरी

डिंग लय मिळवण्यासाठी झगडत असताना गुकेश मात्र महत्त्वाच्या स्पर्धा गाजवतो आहे. बुडापेस्ट येथे ऑलिम्पियाडमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देताना गुकेशने नेत्रदीपक कामगिरी करून स्वत:साठी पहिल्या पटावर वैयक्तिक सुवर्ण पटकावले. २०२२ सालच्या चेन्नई ऑलिम्पियाडमध्येही गुकेशने वैयक्तिक सोनेरी यश संपादन केले होते. मधल्या काळात गुकेशने ‘कँडिडेट्स’ स्पर्धा जिंकून डिंगचा आव्हानवीर होण्याचा मान मिळवला.

डिंगची विजिगीषु वृत्ती

गेले काही महिने चाचपडणाऱ्या डिंगची अवस्था मागच्या जगज्जेतेपदाच्या वेळी काही वेगळी नव्हती. नेपोम्नियाशी कायम सुंदर खेळून विजय मिळवायचा आणि डिंग लगेच आपली मरगळ झटकून पुनरागमन करायचा. असे तब्बल तीन वेळा झाले आणि अखेर डिंगच्या विजिगीषु वृत्तीचा विजय झाला. आता सर्वांच्या मते गुकेशने फक्त सिंगापूरला जायचे बाकी आहे. त्याने तिथे जायचे आणि डिंग शरण येईल अशीच सामान्य बुद्धिबळप्रेमींची अपेक्षा आहे. परंतु ही जगज्जेतेपदाची लढत आहे. नेहमीच्या स्पर्धांना लागणारे सगळे नियम येथे लागू होत नाहीत. रोज-रोज त्याच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध किमान १४ डाव खेळायचे आहेत. अशात मानसिक कणखरतेचा कस लागणार आहे.

हेही वाचा – IND vs AUS: सिराज आणि लबुशेन भर मैदानात एकमेकांशी भिडले, लबुशेनची कृती पाहून विराटही संतापला अन्… VIDEO व्हायरल

डिंगच्या अपयशाचे कारण काय?

बुडापेस्टला सुवर्णपदक विजेत्या महिला संघाचे प्रशिक्षक अभिजित कुंटे म्हणतात की ऑलिम्पियाडमध्ये डिंगचा हात खेळी करताना थरथर कापत होता. त्याला मानसोपचारतज्ज्ञांनी भरपूर औषधे दिल्यामुळे असे होत असल्याची आवई होती. परंतु हे सगळे करण्यामागे चिनी संघाचा गुकेशला बेसावध ठेवण्याचा कावा असू शकतो. अर्थात गुकेशच्या प्रशिक्षणाची मदार पाच वेळा जगज्जेता राहिलेल्या विश्वनाथन आनंदवर आहे आणि त्यामुळे बुद्धिबळाच्या दृष्टीने गुकेश परिपूर्ण आहे. आता १८ वर्षीय गुकेशच्या रूपात भारत जगाला इतिहासातील सर्वांत लहान जगज्जेता देतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(लेखक द्रोणाचार्य पुरस्कार विजेते बुद्धिबळ प्रशिक्षक आहेत.)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World chess championship 2024 match between india s d gukesh china s ding liren css