सिंगापूर : विद्यामान जगज्जेता चीनचा डिंग लिरेन आणि भारताचा आव्हानवीर दोम्माराजू गुकेश यांच्यातील जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीतील नववा डावही बरोबरीत सुटला. या लढतीतील पहिल्या तीनपैकी दोन डावांचे निर्णायक निकाल लागले होते. त्यानंतर मात्र सलग सहा डावांत दोघांना बरोबरीवर समाधान मानावे लागले आहे.
जगज्जेतेपदाच्या लढतीत गुरुवारीही ‘डाव नवा, निकाल तोच’…असे काहीसे चित्र होते. गेल्या काही डावांप्रमाणेच या डावातही गुकेशने धोका पत्करण्याचा प्रयत्न केला, पण डिंगने बचावात्मक खेळ करत त्याला विजयापासून दूर ठेवले. त्यामुळे नऊ डावांनंतर दोघांमध्ये ४.५-४.५ अशी गुणांची बरोबरी आहे. या लढतीचे पाच डाव शिल्लक असून जेतेपद मिळवण्यासाठी दोघांनाही आणखी तीन गुणांची आवश्यकता आहे. शुक्रवारचा दिवस विश्रांतीचा असून शनिवारी दहावा डाव खेळवला जाईल.
चौदा पारंपरिक डावांअंती लढतीत बरोबरी असल्यास विजेता ठरवण्यासाठी जलद प्रकाराचा ‘टायब्रेकर’ खेळवण्यात येईल. जलद प्रकारातील बुद्धिबळात डिंग आपला वेगळा लौकिक राखून आहे. त्यामुळे ही लढत जलद ‘टायब्रेकर’मध्ये नेण्याचा डिंगचा प्रयत्न असल्याचे दिवसेंदिवस स्पष्ट होत आहे.
हेही वाचा >>> चॅम्पियन्स करंडक स्पर्धा संमिश्र प्रारूप आराखड्यानुसारच? २०२७ सालापर्यंतच्या सर्व स्पर्धांसाठी हाच नियम
कॅटलान पद्धतीने सुरुवात
नवव्या डावात पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळणाऱ्या गुकेशने कॅटलान पद्धतीने सुरुवात केली, ज्याला डिंगने बोगो इंडियन बचावाने प्रत्युत्तर दिले. डिंगला प्रत्येक चालीआधी बराच विचार करावा लागत होता. या दोघांमध्ये १४व्या चालीत मोहऱ्यांची आदलाबदल झाली. गुकेशला २०व्या चालीत डिंगवर दडपण आणण्याची संधी होती, पण त्याला वरचष्मा मिळवता आला नाही. डिंग वेळेचे गणित साधण्यात अपयशी ठरणार असे वाटत असतानाच त्याने अचूक चालींसह पटावर समान स्थिती मिळवली. यानंतर गुकेशने आक्रमक पवित्रा अलवंबण्याचा प्रयत्न केला. मात्र, डिंगचा बचाव भेदणे त्याला शक्य झाले नाही. अखेर ५४व्या चालीअंती दोघांनी बरोबरी मान्य केली.
आतापर्यंतच्या डावांपैकी प्रेक्षकांच्या दृष्टीने सर्वांत रटाळ डाव असे नवव्या डावाचे वर्णन केले तर ते चुकीचे ठरणार नाही. दोन तुल्यबळ योद्धे ज्या वेळी जपून खेळतात त्या वेळी डाव असा होतो. जगज्जेत्या डिंगने ९५ वर्षांपूर्वीच्या आव्हानवीराच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या बोगो इंडियन बचावाची सुरुवात केली. पांढऱ्या मोहऱ्यांकडून गुकेशने प्रयत्न केले, पण त्याला हाती काहीही लागले नाही. या जगज्जेतेपदासाठी ४० खेळ्यांच्या आधी बरोबरी घेता येत नाही असा एक नियम ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे दोघेही दोन राजे उरेपर्यंत ५३ चाली खेळले आणि बरोबरी झाली. मात्र, २४व्या खेळीलाच हा डाव बरोबरीत सुटणार याचा अंदाज सर्वांना आला होता. दोघांनी एकही चूक केली नाही असा हा पहिलाच डाव असल्यामुळे उरलेले पाच डाव उच्च दर्जाचे झाले तर प्रेक्षकांना १४ डावांअखेर ‘टायब्रेकर’चा थरार अनुभवता येईल. – रघुनंदन गोखले, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते बुद्धिबळ प्रशिक्षक.