जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनविरुद्धची ११वी फेरी विश्वनाथन आनंदसाठी ‘करो या मरो’ अशी असणार आहे. १०व्या फेरीनंतर कार्लसन एका गुणाने आघाडीवर असल्यामुळे पुढील दोन सामन्यांत आनंदला एका लढतीत विजय मिळवावा लागणार आहे. अन्यथा, कार्लसन जगज्जेतेपदावर नाव कोरणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.
गेल्या वर्षी कार्लसनविरुद्ध पराभूत व्हावे लागल्यामुळे आनंदला जगज्जेतेपद गमवावे लागले होते. या वेळी सर्वसमावेशक तयारीनिशी उतरलेल्या आनंदने सुरुवात चांगली केली मात्र सहाव्या डावातील पराभव आनंदसाठी मारक ठरणार आहे. आता जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील दोन लढती शिल्लक असल्यामुळे कार्लसनचे वर्चस्व मोडून काढत आव्हान जिवंत राखण्यासाठी आनंदला विजय अनिवार्य आहे.
कार्लसन ५.५-४.५ अशा आघाडीवर असल्यामुळे त्याचे पारडे जड मानले जात आहे. ११व्या फेरीत विजय मिळवल्यास आनंद शेवटच्या लढतीत बाजी पलटवू शकतो. शेवटच्या लढतींमध्ये कार्लसन पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळणार आहे. सहाव्या लढतीत कार्लसनच्या हातून झालेली घोडचूक आनंदच्या लक्षात आली नाही. त्यानंतर कार्लसनने सुरेख चाली रचत आनंदवर विजय मिळवला. त्यानंतर प्रत्येक लढतीगणिक आनंदच्या विजयाची शक्यता धूसर होत चालली आहे. कार्लसनच्या खेळातही गेल्या वर्षीप्रमाणे सातत्य नाही मात्र आनंदच्या खेळात अचूकता असतानाही कार्लसनने त्यावर अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर वर्चस्व गाजवले आहे.
शेवटच्या चार लढती बरोबरीत सुटल्या असून, आनंदने चिवट खेळ करत कार्लसनला जोरदार टक्कर दिली आहे. सहा तास चाललेली सातवी लढत अखेर १२२व्या चालीत बरोबरीत संपली. आठव्या लढतीत आनंदने आघाडी घेतली होती. मात्र कार्लसनच्या प्रतिहल्ल्यासमोर आनंदने माघार घेतली. १०व्या लढतीत आघाडी घेण्याची संधी आनंदने गमावली आणि त्याला बरोबरीत समाधान मानावे लागले.
कार्लसनने विविध समीकरणांसाठी स्वत:ला सिद्ध केले असून, आनंदला त्याच्या नेहमीच्या शैलीपासून वेगळा खेळ करण्यासाठी त्याने भाग पाडले आहे. ११व्या लढतीत पराभव झाल्यास आनंदचे जगज्जेतेपद मिळवण्याचे स्वप्न संपुष्टात येणार आहे. त्यामुळे आनंदला विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. विजयासह आनंदला जेतेपदाच्या शर्यतीतील आव्हान कायम राखता येईल. दोन्ही लढती बरोबरीत सुटल्यास किंवा आनंद पराभूत झाल्यास कार्लसन पुन्हा एकदा जगज्जेता होणार आहे.
आनंदसाठी ‘करो या मरो’
जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनविरुद्धची ११वी फेरी विश्वनाथन आनंदसाठी ‘करो या मरो’ अशी असणार आहे.
First published on: 23-11-2014 at 04:18 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World chess championship all or nothing situation for vishwanathan anand