अस्ताना : रशियाचा ग्रँडमास्टर इयान नेपोम्नियाशीने जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीत ११व्या डावात झटपट बरोबरी साधून ६-५ अशी आघाडी कायम राखून आपली बाजूही भक्कम केली. जागतिक अजिंक्यपद लढतीमध्ये १४ डावांत ७.५ गुण मिळवणारा विजेता ठरतो. नेपोम्नियाशीला यासाठी उर्वरित तीन फेऱ्यांमधून केवळ १.५ गुणांची आवश्यकता आहे. लढतीतील ११वा डाव ३९ चालींनंतरच बरोबरीत सोडवण्यात नेपोम्नियाशी आणि डिंग तयार झाले. हा डाव अवघा १ तास ४० मिनिटे चालला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळणाऱ्या नेपोम्नियाशीने रुय लोपेझच्या ‘बर्लिन लाइन’ पद्धतीने डावाची सुरुवात केली. सुरुवातीच्या खेळानंतर नेपोम्नियाशी काहीसा विचलित झाला होता; पण डिंगही फार काही पुढाकार घेऊन खेळताना दिसत नव्हता. डाव पुढे जात असताना नेपोम्नियाशीने हळूहळू पुढाकार घेण्यास सुरुवात केली आणि पटावरील आपली स्थिती भक्कम केली. तुलनेत डिंग अधिक बचावात्मक खेळत गेला आणि त्यामुळे डिंगच्या खेळात एक प्रकारची निष्क्रियता आली.

डावाच्या १५व्या चालीला डिंगने ‘सी४’ ही मोहऱ्यांची चाल अपेक्षेपेक्षा लवकर खेळली. या चालीपर्यंत नेपोम्नियाशीला फारशी संधी नव्हती. मात्र, या चालीने डिंगचा पटावरील कमकुवतपणा स्पष्ट झाला. या वेळी पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळणाऱ्या नेपोला डिंगवर अधिक दबाव आणण्याची संधी होती. मात्र, नेपोम्नियाशीने तसे न करता पटावरील स्थिती अधिक सुलभ करण्याचा पर्याय निवडला. त्यानंतर पटावर डाव अखेरच्या टप्प्यात आला आणि त्याच स्थितीत दोघांनी लढत बरोबरीत सोडवण्याचा निर्णय घेतला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World chess championship match ian nepomniashi ding tied in 11th round amy
Show comments