World Cricketers Association’s report to change cricket: सध्या सगळीकडे आयपीएल २०२५ चा फिव्हर पाहायला मिळत आहे. जगभरातील बरेचसे क्रिकेटपटू ही टी-२० लीग खेळण्यासाठी सध्या भारतात उपस्थित आहेत. दरम्यान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० मालिका पार पडली असून वनडे मालिका खेळवली जाणार आहे. त्यानंतर काहीच दिवसाच पीएसएल म्हणजे पाकिस्तान सुपर लीगला सुरूवात होणार आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामनेही सुरू होतील आणि इतर देशातील टी-२० लीगही खेळवल्या जातील. पण येत्या काळात वर्षभरात सगळीकडेच टी-२० लीगचं प्रस्थ असणार आहे. यासंदर्भातील एक रिपोर्ट समोर आला आहे.
वर्ल्ड क्रिकेटर्स असोसिएशन (डब्ल्यूसीए) ने क्रिकेटच्या सध्याच्या चित्राबाबत एक रिपोर्ट दिला आहे, ज्याचं नाव History, Embracing Change आहे. सहा महिन्यांच्या सर्वेक्षणानंतर डब्ल्यूसीएने प्रमुख शिफारसी मांडल्या आहेत ज्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट संरक्षित ठेवण्यासाठी मॉडेल, समान महसूल वितरण मॉडेल जे स्पर्धात्मक असेल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या वाढासीठी संतुलन राखणारे असेल. याचबरोबर टी-२० लीगमध्ये खेळाडूंचे चांगले नियमन आणि आयसीसी एक जागतिक प्रशासकीय संस्था असून एखादं क्लब क्रिकेट नसल्याचे म्हटले आहे.
गेल्या काही वर्षांत जगातील विविध देशांमध्ये टी-२० लीगचे प्रमाण वाढले आहे. भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त, ऑस्ट्रेलिया ते अमेरिकेपर्यंत टी-२० फ्रँचायझी लीग खेळल्या जातात, ज्या वर्षाच्या वेगवेगळ्या महिन्यांत आयोजित केल्या जातात. यापैकी काही एकाच वेळी खेळवल्या जातात. यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामनेही सुरू असतात, त्यामुळे अनेक मोठे खेळाडू या लीगमध्ये खेळत नाहीत किंवा लीगमुळे अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही ब्रेक घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट कमी करायचं की लीग क्रिकेटवर बंदी घालायची, असा वाद सतत सुरू असतो.
वर्ल्ड क्रिकेटर्स असोसिएशनचा धक्कादायक रिपोर्ट
या संदर्भात, WCA ने एका सर्वेक्षणाच्या आधारे एक तपशीलवार अहवाल तयार केला आहे, ज्यामध्ये पॅट कमिन्स, रशीद खान, एलिसा हिली, एडन मारक्रम, जोस बटलर, टिम साऊदी यांच्यासह अनेक प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना प्रश्नोत्तरे विचारण्यात आली होती. या अहवालात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला महत्त्व देणं आणि टी-२० लीगची वाढती याबाबत प्रश्न विचारण्यात आले. या अहवालात टी-२० फ्रँचायझी लीगला भविष्यातील क्रिकेट मानले गेले आहे आणि त्याला महत्त्व देण्याची शिफारस आयसीसीला करण्यात आली आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या मते, या अहवालात असे म्हटले आहे की, येत्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटऐवजी टी-२० लीगला प्राधान्य द्यावे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी वर्षभरात ४ वेगवेगळ्या विंडो देण्यात याव्यात. त्यानुसार दरवर्षी ८४ दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी देण्यात यावेत. जे प्रत्येकी २१ दिवसांच्या ४ वेगवेगळ्या विंडोमध्ये विभागले जाईल. ही विंडो फेब्रुवारी-मार्च, मे-जून, सप्टेंबर आणि डिसेंबरमध्ये द्यावी. या कालावधीत कोणत्याही प्रकारची टी-२० लीग खेळवली जाणार नाही. त्यामुळे टी-२० लीगमध्ये खेळताना खेळाडूंना कोणतीही अडचण येणार नाही आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही संघर्ष होणार नाही.
अहवालात असंही सांगण्यात आले आहे की या विंडो दरम्यान, प्रत्येक संघ किमान एक मालिका खेळेल, ज्यामध्ये तीन फॉरमॅटमधील प्रत्येकी किमान एक सामना असेल. प्रत्येक फॉरमॅटसाठी लीग टेबल असेल, ज्याच्या आधारे संघ त्या फॉरमॅटच्या ICC वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरू शकतील. हे सर्व दोन वर्षांच्या चक्राच्या आधारे ठरवले जाईल.
बीसीसीआयच्या कमाईमध्ये लक्षणीयरित्या घट होणार?
अहवालातील टी-२० लीगशिवाय दुसरा मोठा मुद्दा म्हणजे आयसीसीचे उत्पन्न. आयसीसीला त्यांच्या इवेंट्समधून प्रसारण हक्कातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा एक भाग प्रत्येक देशाच्या क्रिकेट बोर्डांमध्ये वितरीत केला जातो. अलीकडील वितरणावर आधारित, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ICC कडून सर्वाधिक ३८.५ टक्के महसूल मिळतो कारण ICC भारतीय प्रसारकांकडून सर्वाधिक कमाई करते. तर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि पाकिस्तानसह इतर देशांच्या क्रिकेट बोर्डांना १०% पेक्षा कमी पैसे मिळतात.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बीसीसीआयचा दबदबा वाढला आहे, याबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हे प्रश्न दूर करण्याची शिफारसही या अहवालात करण्यात आली आहे. या अहवालात जास्तीत जास्त आणि किमान कमाईचे वाटप करण्याच्या गरजेवर भर देण्यात आला आहे. या अंतर्गत, आयसीसीच्या शीर्ष २४ सदस्यांमध्ये कमाल १० टक्के आणि किमान २ टक्के महसूल वाटा असावा. म्हणजेच, याची अंमलबजावणी झाल्यास बीसीसीआयला आयसीसीकडून ३८.५ टक्क्यांऐवजी जास्तीत जास्त १० टक्के रक्कम मिळू शकेल. WCA ने आपला अहवाल ICC ला सादर केला आहे.