कोस्टा रिकाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यातील पराभवाने उरुग्वे संघ अडचणीत सापडला होता. गेल्या वेळी उपान्त्य फेरीत धडक मारणाऱ्या उरुग्वेच्या बाद फेरीतील आशा जवळपास संपुष्टात येणार होत्या. पण ‘‘मला संधी द्या. इंग्लंडला कसे हरवायचे, ते मला माहीत आहे,’’ असे दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात बेंचवर बसलेला लुइस सुआरेझ तावातावाने सांगत होता. अखेर प्रशिक्षक ऑस्कर ताबारेझ यांनी ‘अर्धतंदुरुस्त’ असलेल्या सुआरेझला संधी दिली. आणि इंग्लंडविरुद्ध दोन गोल करणारा सुआरेझ उरुग्वेसाठी खऱ्या अथाने हीरो ठरला. पण मैदानावर कायम वादग्रस्त कारणांसाठी लोकप्रिय असलेला सुआरेझ पुन्हा एकदा ‘बॅड बॉय’च्या भूमिकेत दिसून आला.
लुइस सुआरेझ म्हणजे वादग्रस्त व्यक्तिमत्त्व. कायम प्रसिद्धीच्या झोतात असलेले, टीकाकारांना सडेतोड उत्तर देणारा आणि जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाणारा. अफाट गुणवत्तेसह सामना एकहाती जिंकून देण्याची क्षमता असलेला सुआरेझ नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणांमुळे चर्चेत राहिला. रॉबिन व्हॅन पर्सीने स्पेनविरुद्ध हेडरवर केलेला अप्रतिम गोल आणि बुधवारी सुआरेझने इटलीच्या जॉर्जियो चिएलिनीचा घेतलेला चावा यामुळे ब्राझीलमधील विश्वचषक स्पर्धा कायम सर्वाच्या स्मरणात राहील. उरुग्वेचे बाद फेरीतील अस्तित्व पणाला लागलेले असताना इटलीच्या बचावपटूंनी सुआरेझला गोल करण्यासाठी जणू अटकाव घातला होता. अखेर वैफल्यग्रस्त सुआरेझचे रागावरील नियंत्रण सुटले आणि त्याने चिएलिनीच्या खांद्यावर चक्क चावा घेतला. खरे तर या प्रकारासाठी रेफ्रींनी त्याला लाल कार्ड दाखवायला हवे होते. पण हे कृत्य लपवण्यासाठी त्याने जमिनीवर पडून आपल्याच चेहऱ्याला लागल्याचा बनाव केला. पण फुटबॉलमधील ‘बॅड बॉय’ची त्याची प्रतिमा मात्र पुन्हा अधोरेखित झाली.
कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच सुआरेझ वादग्रस्त ठरत गेला. अनेक वादग्रस्त प्रकरणांनी सुआरेझची कारकीर्द गाजली. उरुग्वेच्या युवा संघातून खेळत असताना सुआरेझने १५व्या वर्षी रेफ्रीला डुक्करढुशी लगावली होती. बंदी असतानाही दारू पिताना आणि पार्टी करताना आढळल्यामुळे सुआरेझ पुन्हा देशासाठी खेळता कामा नये, असा इशारा त्याला प्रशिक्षकांनी दिला होता. त्यानंतर सुआरेझ नेदरलँड्समधील ग्रॉनिंगजेन संघाकडून खेळू लागला. पण नेदरलँड्समधील जीवनशैलीशी जुळवून घेणे आणि तेथील भाषा शिकणे त्याला अवघड जात होते. त्यामुळे त्याची ही कारकीर्द पाच सामन्यांनंतर संपुष्टात आली. पण त्या वेळी चार गोल करणाऱ्या सुआरेझला रेफ्रींनी एक लाल कार्ड आणि चार पिवळी कार्डे दाखवली होती. अजाक्सने करारबद्ध केल्यानंतर त्याने आपल्या गुणवत्तेची झलक दाखवली. पण बरीचशी पिवळी कार्ड आणि फ्री-किक् घेण्यावरून सहकारी अल्बर्ट लेक याच्याशी ड्रेसिंगरूममध्ये झालेले भांडण यामुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली.
लिव्हरपूलशी २०११मध्ये करारबद्ध झाल्यानंतर पहिल्याच मोसमात त्याने आपल्या संघाला १२व्या स्थानावरून सहाव्या स्थानावर आणले. दुसऱ्या वर्षी जगातील सर्वोत्तम खेळाडूला दिल्या जाणाऱ्या बलॉन डी’ऑर या पुरस्काराच्या शर्यतीत त्याला स्थान मिळाले. पण तिसऱ्या वर्षी फुलहॅमच्या चाहत्यांच्या दिशेने विचित्र हावभाव केल्याप्रकरणी त्याला फुटबॉल असोसिएशनने एका सामन्याच्या बंदीची शिक्षा सुनावली. पहिल्याच मोसमात मँचेस्टर युनायटेडच्या पॅट्रिस एव्हराला वर्णद्वेषी शेरेबाजी केल्यामुळे सुआरेझ अडचणीत सापडला. त्याने हे आरोप फेटाळले. पण सात दिवस चाललेल्या सुनावणीनंतर सुआरेझ दोषी आढळला. त्यामुळे त्याच्यावर आठ सामन्यांची बंदी आली. या बंदीविरोधात अपील करण्यासाठी लिव्हरपूलने त्याला पाठिंबा दिला. पण तसे करण्याऐवजी त्याने टी-शर्टवर आपला फोटो आणि वर्णद्वेषी वाक्य छापत निषेध व्यक्त केला. इंग्लिश फुटबॉलची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप लावत फुटबॉल असोसिएशनने त्याच्याविरोधात ११५ पानी अहवाल सादर केला. दुसऱ्यांदा असा प्रकार घडल्यास, इंग्लिश प्रीमिअर लीगमधून त्याची कायमची गच्छंती करण्यात येईल, असे आदेशही दिले. बंदीची शिक्षा भोगून परतलेल्या सुआरेझने सामन्यादरम्यान टॉटनहॅमच्या स्कॉट पार्करला लाथ घातली.
मँचेस्टर युनायटेडविरुद्धच्या सामन्याआधी खेळाडूंशी हस्तांदोलन करताना त्याने पॅट्रिस एव्हराला टाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोघांनाही शिक्षा सुनावण्यात आली होती. गेल्या तीन वर्षांत तीन जणांचे चावे घेणाऱ्या सुआरेझवर चेल्सीच्या ब्रानिस्लाव्ह इव्हानोव्हिकला चावल्याप्रकरणी दहा महिन्यांची बंदी लादण्यात आली होती. २०१०च्या विश्वचषक स्पर्धेत एकापाठोपाठ गोलांचा धडाका लावणारा सुआरेझ वेगळ्याच कारणाने चर्चेत राहिला. घानाविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात १-१ अशी बरोबरी असताना अतिरिक्त वेळेत डॉमिनिक अदियाने हेडरद्वारे मारलेला फटका सुआरेझने हाताने अडवला होता. सुआरेझला तात्काळ मैदानाबाहेर धाडण्यात आले. पण त्याने उरुग्वेचा पराभव टाळला होता. कारण हा सामना उरुग्वेने पेनल्टी-शूटआउटमध्ये जिंकून उपान्त्य फेरीत धडक मारली होती.
मैदानावर धावताना अनेक वेळा रेफ्रींना धडक मारणाऱ्या सुआरेझला स्पेनमधील ‘एल गोल डिजिटल’ने जगातील वाईट फुटबॉलपटूंमध्ये पाचवे स्थान दिले होते. लुइस ‘चावरे’झ अशीच प्रतिमा सध्या त्याची निर्माण झाली आहे.

Story img Loader