धारदार आक्रमणाच्या जोरावर आपल्या प्रतिस्पर्धी संघाची बचाव फळी निष्प्रभ करण्याबाबत फ्रेंच खेळाडू ख्यातनाम आहेत. त्यांनी घरच्या मैदानावर १९९८मध्ये विश्वचषक जिंकला होता. त्या वेळी त्यांनी अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेल्या बलाढय़ ब्राझील संघावर ३-० असा सनसनाटी विजय मिळविला होता. जेतेपदाची क्षमता असलेल्या फ्रान्सला २००६मध्ये पुन्हा या विश्वचषकावर नाव कोरण्याची संधी मिळाली होती, मात्र त्यांना अंतिम लढतीत इटली संघाकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-५ अशी हार पत्करावी लागली होती. बाद फेरीत चमकदार कामगिरी करण्यात त्यांचे खेळाडू माहीर आहेत. त्यांनी १९५८ व १९८६मध्ये या स्पर्धेत तिसरे स्थान मिळविले आहे, तर १९८२मध्ये त्यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. अर्थात २००२ व २०१०मध्ये त्यांना पहिल्या फेरीत बाद होण्याची नामुष्की सोसावी लागली. २००२मध्ये त्यांना एकही गोल नोंदविता आला नव्हता. त्या स्पर्धेत त्यांना सेनेगलसारख्या दुबळ्या संघानेही पराभूत केले होते.
फ्रान्सने मायकेल प्लॅटिनी, लिलियन थुराम, थिअरी हेन्री, झिनेदीन झिदान यांच्यासारखे अनेक कीर्तिवान खेळाडू घडविले आहेत. प्लॅटिनी यांच्या नेतृत्वाखाली फ्रान्सने १९९८ मध्ये विश्वचषक, तर २००० मध्ये युरो चषक जिंकला होता. फ्रान्सने दोन वेळा युरो चषक पटकाविला आहे, तर कॉन्फेडरेशन करंडक स्पर्धेत त्यांनी दोन वेळा भाग घेत दोन्ही वेळा अजिंक्यपद मिळविले आहे. त्याखेरीज फ्रान्सने अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा जिंकल्या आहेत. ऑलिम्पिकसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत त्यांनी १९००मध्ये रौप्यपदक, तर १९८४मध्ये सुवर्णपदक मिळविले आहे.
फ्रान्सला यंदाच्या विश्वचषकासाठी झालेल्या पात्रता स्पर्धेत संमिश्र यश मिळाले. त्यांनी जॉर्जियाविरुद्ध पहिल्या सामन्यात विजय मिळविला, तर दुसऱ्या लढतीत त्यांना बरोबरी स्वीकारावी लागली. स्पेनविरुद्ध त्यांना पराभव पत्करावा लागला, मात्र त्यांनी बेलारुस व फिनलंड यांच्यावर मात केली. प्ले-ऑफ गटात त्यांना युक्रेनने पहिल्या लढतीत २-० असे हरविले, मात्र नंतर फ्रान्सने त्यांना ३-० असे पराभूत केले.
फ्रान्स (इ-गट)
*फिफा क्रमवारीतील स्थान : १९
विश्वचषकातील कामगिरी
* सहभाग : १४ वेळा (२०१४ सह)
* विजेतेपद : १९९८
* उपविजेतेपद : २००६
* तिसरे स्थान : १९५८, १९८६
* चौथे स्थान : १९८२
संघ
गोलरक्षक : ह्य़ुगो लॉरिस, मायकेल लँद्रेऊ, स्टीफन रुफीयर. बचाव फळी : पॅट्रिस एव्हरा, बॅकेरी सागना, मथेयु देबुची, मामादोऊ साखो, लॉरेन्ट कोशिलनी, रॅफेल व्हेरॉन, एलिक्विम मॅनगोल, लुकास दिगेनी. मधली फळी : फ्रँक रिबरी, मॅथिऊ व्हॅल्बुएना, योहान कॅबेये, ब्लेस मातुईडी, मुस्सा सिसोको, रिओ मॅव्हुबा, पॉल पोग्बा, क्लेमेन्ट ग्रेनीअर, अन्तोनी ग्रीझमन. आघाडी फळी : करिम बेंझेमा, ऑलिव्हर गिरौड, लोएक रिमी.
* स्टार खेळाडू : ह्य़ुगो लॉरिस, बॅकेरी सागना, करिम बेंझेमा, ऑलिव्हर गिरौड, लोएक रिमी.
*व्यूहरचना : ५-३-२ किंवा २-४-४-२
* प्रशिक्षक : दिदियार डेसचॅम्प
बलस्थाने व कच्चे दुवे
दिदियार डेसचॅम्पसारख्या अनुभवी खेळाडूच्या मार्गदर्शनाखाली फ्रान्सचा संघ उतरणार आहे. उत्तम सांघिक समन्वय व लांब पासेस देत खेळणे, हे फ्रान्सच्या खेळाडूंचे वैशिष्टय़ आहे. मधल्या फळीतील अनुभवी खेळाडूंवर त्यांची मुख्य मदार असते. हे खेळाडू आघाडीच्या फळीतील खेळाडूंना झटपट पासेस देत प्रतिस्पर्धी खेळाडूंना फारशी संधी देत नाहीत. चेंडूवर चांगले नियंत्रण ठेवण्याची कला त्यांना योग्य रीतीने अवगत आहे. नियोजनबद्ध खेळ ही त्यांची जमेची बाजू आहे.गोल नोंदविण्याबाबत अपेक्षित असलेल्या अचूकतेमध्ये त्यांचे खेळाडू कमकुवत मानले जातात. विशेषत: उपांत्य किंवा अंतिम लढतीत दडपण घेताना त्यांच्याकडून अनेक वेळा सोप्या संधी दवडल्या जातात. शेवटच्या महत्त्वपूर्ण वेळेत त्यांच्या चालींमध्ये विस्कळीतपणा दिसून येतो. बेशिस्त वर्तन व दांडगाईचा खेळ ही त्यांच्यासाठी त्रासदायक गोष्ट आहे.

अपेक्षित कामगिरी
बाद फेरीत स्थान मिळविण्यात त्यांना फारशी अडचण येणार नाही. साखळी गटात त्यांच्यापुढे स्वित्र्झलड, इक्वेडोर व होंडुरास यांचे आव्हान आहे. त्यांचा आजपर्यंतचा दबदबा लक्षात घेता साखळी गटातील सर्व सामने तेजिंकतील अशी अपेक्षा आहे. स्वित्र्झलडकडून त्यांना कडवी झुंज मिळण्याची शक्यता आहे. अन्य दोन संघांविरुद्ध मोठय़ा फरकाने विजय मिळविण्याची क्षमता त्यांच्या खेळाडूंमध्ये आहे. फक्त त्यासाठी त्यांच्या खेळाडूंनी संयमाने व आत्मविश्वासाने खेळ करण्याची आवश्यकता आहे.

Story img Loader