भारताविरुद्धच्या टी २० आणि एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाने यजमानांना धूळ चारली. टी २० मालिका त्यांनी २-० अशी जिंकली, तर २-० ने भारत आघाडीवर असताना ऑस्ट्रेलियाने पुढील सलग ३ सामने जिंकत मालिका २-३ अशी स्वतःच्या नावे केली. या एकदिवसीय मालिकेत सर्वात मोठी अडचण दिसून आली ती मधल्या फळीतील फलंदाजांची.. या दोनही मालिकांमध्ये भारतीय संघातील मधल्या फळीच्या उणीवा स्पष्टपणे दिसून आल्या. याशिवाय रोहित, शिखर आणि विराट या भक्कम वरच्या फळीनंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणाऱ्या फलंदाजाचा प्रश्नदेखील अनुत्तरित राहिला. याबाबत सध्या अनेक पर्यांयांचा विचार सुरु आहे. या दरम्यान, मुंबईकर अजिंक्य रहाणे याने एक सूचक वक्तव्य केले आहे.

विश्वचषक स्पर्धा अवघ्या दोन महिन्यांवर आली आहे. मी जर आगामी IPL मध्ये चांगली कामगिरी केली, तर मला स्वतःहूनच विश्वचषक संघात स्थान मिळेल. विश्वचषकाच्या भारतीय संघातील स्थानासाठी कोणताही वेगळा दृष्टीकोन मी ठेवलेला नाही. कारण तुम्हचा खेळ आणि तुम्ही कशा पद्धतीचे क्रिकेट खेळता, हे पाहणे महत्वाचे असते. IPL असो किंवा इतर कोणतीही स्पर्धा असो, संघासाठी धावा काढणे आणि चांगली कामगिरी करून संघाला विजय मिळवून देणे, हे महत्वाचे असते, असे अजिंक्य म्हणाला.

विश्वचषक स्पर्धेबाबत खूप पुढचा विचार करण्यापेक्षा आता मला राजस्थान रॉयल्स संघातील माझ्या कामगिरीचा विचार करणे महत्त्वाचे वाटते. जर मी IPL चांगले खेळू शकलो, तर माझी कामगिरी पहिली जाईल आणि मला विश्वचषकासाठी संघात समाविष्ट केले जाईल. मला वाटते की तुम्ही स्वत:ला व्यक्त करणे हे जरुरीचे असते. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत, त्यांचा विचार करुन त्याचे दडपण घेण्यात काहीच अर्थ नसतो. त्यामुळे सध्या माझे लक्ष हे IPL वरच केंद्रीत असणार आहे, असे अजिंक्यने स्पष्ट केले.

रहाणेने भारताकडून शेवटचा एकदिवसीय सामना १६ फेब्रुवारी २०१८ ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला आहे. त्यानंतर तो जवळपास एक वर्षाहून अधिक काळ भारताच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघातून बाहेरच आहे. त्याने आतापर्यंत ९० एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात त्याने ३ शतके आणि २४ अर्धशतकांसह ३५.२६ च्या सरासरीने २ हजार ९६२ धावा केल्या आहेत.या वर्षीच्या IPL मध्ये राजस्थानचा पहिला सामना २५ मार्चला किंग्ज इलेव्हन पंजाबशी होणार आहे.

Story img Loader