ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये लॉर्ड्सवर मंगळवारी होणारा सामना विश्वचषकातील सर्वात रोमांचक सामना असेल. मैदानावर दोन्ही देश एकमेकांचे कट्टर आणि परंपरागत शत्रू म्हणून ओळखले जातात. हा सामना दोन्ही देशासाठी महत्त्वाचा आहे, कारण ऑगस्टमध्ये दोन्ही देशांमध्ये प्रतिष्ठेची अॅशेस मालिका खेळली जाणार आहे. या महत्वाच्या सामन्यात इंग्लंडचा संघ प्रचंड दबावात असल्याचे मत भारताचा महान खेळाडू सचिन तेंडूलकरने व्यक्त केले आहे. उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी इंग्लंडला विजय मिळवावाच लागणार आहे. त्यामुळे इंग्लंडच्या संघावर प्रचंड दबाव आला आहे.
अॅशेस मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ ऑगस्टमध्ये इंग्लंड दौऱ्यावर येणार आहे. ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकला नाही तरी पुढे येणारी अॅशेस मालिका त्यांना जिंकायची आहे; परंतु इंग्लंडमधील नागरिकांना विश्वचषक आणि अॅशेस हे दोन्ही विजय त्यांच्या नावावर पाहिजे आहेत. त्यामुळे इंग्लंडचा संघ दबावाखाली गेला आहे.
विश्वचषकाच्या सुरूवातीपासूनच इंग्लंडकडे विजेतेपदाचा दावेदार म्हणून पाहिले जात होते. मात्र, दोन पराभवामुळे उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी इंग्लंडपुढे अडचणी उभ्या राहिल्या आहेत. सहा सामन्यात इंग्लंडच्या नावावर फक्त ८ गुण आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका संघाकडून इंग्लंडला पराभवाचा धक्का बसला आहे. इंग्लंड संघाचे उर्वरित सामने ऑस्ट्रेलिया , भारत आणि न्यूझीलंड सारख्या तगड्या संघाबरोबर आहेत. उपांत्य सामन्यात जागा फिक्स करण्यासाठी तीन सामन्यापैकी इंग्लंड संघाला दोन विजय मिळवावे लागणार आहेत. अॅशेस मालिका आणि उपांत्या सामन्यात पोहचण्याच्या आव्हानामुळे इंग्लंडला संघ सध्या दबावात असल्याची प्रतिक्रिया सचिनने दिली आहे.
गुणतालिकेत इंग्लंडचा संघ आठ गुणांसह सध्या चौथ्या स्थानावर आहे. बांग्लादेश (सात सामन्यात सात गुण) श्रीलंका (सहा सामन्यात सहा गुण) आणि पाकिस्तान (पाच सामन्यात सहा गुण) यांना उपांत्य फेरीत पोहचण्याची संधी आहे.
इंडिया टुडेशी बोलताना सचिन तेंडूलकर म्हणाला की, ‘लॉर्ड्सवर मंगळवारी सामना खेळताना इंग्लंडचा संघ प्रचंड दबावाखाली असेल. ऑगस्टमध्ये अॅशेज मालिका होणार आहे. त्यापूर्वीच विश्वचषकात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये रंगतदार सामना होणार आहे. गुणतालिकेतील समिकरणामुळे या सामन्यात इंग्लंडपुढे करो किंवा मरोची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या सामन्यामध्ये इंग्लंड प्रचंड दबावात असणार आहे’
श्रीलंकेकडून २० धावांनी पराभूत झाल्यामुळे इंग्लंडच्या आव्हानाला धक्का बसला आहे. हेडिंग्लेच्या खेळपट्टीवर २३३ धावांचे माफक आव्हान पेलताना इंग्लंडचा संघ २१२ धावांत गारद झाला. स्पर्धेच्या सुरुवातीला पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर दुसरा पराभव खात्यात जमा झाला असला तरी इंग्लंडचा संघ विश्वचषक गुणतालिकेत अव्वल चार संघांमध्ये समाविष्ट आहे. इंग्लंडच्या दृष्टीने उत्तरार्धातील वाटचाल अधिक बिकट आहे. कारण प्रथमच विश्वविजेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या या संघाला ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंड या अन्य कडव्या संघांशी सामना करायचा आहे.