सलामीवीर शिखर धवनला झालेल्या दुखापतीमुळे, भारतीय संघाचा डावखुरा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतला भारतीय संघात स्थान मिळालं. विश्वचषक स्पर्धेसाठी १५ जणांचा संघ घोषित करताना एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीने पंतला डावलून दिनेश कार्तिकला संघात स्थान दिलं. मात्र ही संधी नाकारल्यानंतर आपल्यामध्ये सकारात्मक बदल झाल्याचं ऋषभ पंत म्हणाला. BCCI च्या Chahal TV कार्यक्रमात पंत बोलत होता.
“सुरुवातीच्या संघात माझी निवड झाली नव्हती, त्यावेळी माझ्या कामगिरीत काही उणीव राहिली असेल असं मला वाटलं. मात्र यानंतर मी अजुन सकारात्मक झालो. माझा खेळ अजुन कसा सुधरवता येईल याकडे लक्ष दिलं. आयपीएलमध्ये दिल्लीविरुद्ध खेळत असताना मी चांगली कामगिरी केली, त्यानंतरही मी सराव सुरु ठेवला. याचाच मला फायदा झाला.” पंत आपला सहकारी चहलशी संवाद साधत होता.
“एक क्रिकेटपटू म्हणून विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचं माझं स्वप्न होतं. ज्यावेळी शिखर धवनच्या जागेवर मला पर्याय म्हणून इंग्लंडला बोलवण्यात आलं, त्यावेळी मी आईसोबत होतो. तिला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा तिने लगेच मंदिरात जाऊन आपला नवस पूर्ण केला. मी देखील तेव्हा खूप आनंदात होतो.” शिखर धवनच्या जागी ऋषभ पंतची संघात निवड झाली असली तरीही अंतिम ११ जणांच्या संघात त्याला जागा मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.