गेल्या काही वर्षांमध्ये जसप्रीत बुमराहने भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणून आपलं नाव कमावलं आहे. २०१९ विश्वचषक स्पर्धेत पहिल्या दोन सामन्यांमध्ये बुमराहने आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली आहे. आपल्या यॉर्कर चेंडूनी फलंदाजांच्या नाकीनऊ आणणारा बुमराह, मैदानात क्षेत्ररक्षणात ढिला पडतो. अनेकदा सामन्यांमध्ये क्रीडाप्रेमींनी हा अनुभव घेतला आहे. मात्र विश्वचषकादरम्यान बुमराहच्या क्षेत्ररक्षणात सकारात्मक बदल झाल्याचं, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर.श्रीधर यांनी मान्य केलं आहे.
“क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जसप्रीत बुमराह हा प्रचंड मेहनती खेळाडू आहे. २०१६ साली भारतीय संघातला बुमराह आणि आताचा बुमराह यांच्यात आश्वासक बदल झाला आहे, आणि तो क्षेत्ररक्षणात सुधारतो आहे. तरीही त्याला सुधारणेसाठी बराच वाव आहे, आगामी काळात तो सुधारेल”. आर.श्रीधर पत्रकारांशी बोलत होते.
पहिले दोन सामने जिंकल्यानंतर भारतीय संघाचा तिसरा सामना न्यूझीलंडविरुद्घ होता, मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना होऊ शकला नाही. रविवारी भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. त्यामुळे या सामन्यात बुमराहची कामगिरी कशी होते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
अवश्य वाचा – World Cup 2019 : पंत संघात हवा की नको? निवड समिती आणि संघ व्यवस्थापनात बेबनाव