विश्वचषक स्पर्धा अगदी नजीक आली असून लवकरच सराव सामने सुरु होणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रत्येक संघाने आपले सर्वोत्तम खेळाडू संघात निवडले आहेत. भारताच्या संघात सर्वात अनुभवी खेळाडू आहे महेंद्रसिंग धोनी. २०११ चा विश्वचषक उंचावलेल्या धोनीची भारताच्या संघातील उपस्थिती फायद्याची ठरणार आहे असे मत सर्वत्र व्यक्त होताना दिसत आहे. धोनी अजूनही किती तंदुरुस्त आहे, हे क्रिकेटरसिकांनी IPL मध्ये पहिले आहेच. त्यातच आता न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम यानेही धोनीचे कौतुक केले आहे.
महेंद्रसिंग धोनीबद्दल बोलताना मॅक्युलम म्हणाला की धोनी केवळ मैदानावर असला तरी प्रतिस्पर्धी संघाला धडकी भरते. धोनीमुळे संघाला फायदा होता. तो एक अमूल्य असा खेळाडू आहे. एखाद्या संघाविरुद्ध विजय मिळवायचा असेल, तर कशा पद्धतीची योजना आखली गेली पाहिजे याची ब्लु प्रिंट धोनीच्या डोक्यात तयार असते. त्याच्या नुसार त्या सामन्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तो ठरवतो.
तो मैदानावर असला की वेळीच विविध योजना आखतो आणि प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंवर थोडेसे दडपण आणण्यात यशस्वी ठरतो. धोनी जेव्हा क्रीजवर खेळायला येतो तेव्हा तो सामना पूर्णपणे समजून घेतो, खेळपट्टी आणि इतर बाबींचा अंदाज घेतो आणि त्याप्रकारे खेळ करतो. कारण खेळ पूर्णपणे समजून घ्यावंग त्याच्यामध्ये क्षमता आहे, अशा शब्दात मॅक्युलमने धोनीची स्तुती केली.
मॅक्युलमने धोनीसोबत चेन्नईच्या संघात काही काळ क्रिकेट खेळले आहे. त्यामुळे त्याने धोनीला जवळून पाहिले आहे. त्याच्या तंदुरुस्तीबाबत बोलताना मॅक्युलम म्हणाला की तो अजूनही तंदुरुस्त आहे. त्याचा फिटनेस तरुणांना लाजवेल असा आहे. तशातच तो फलंदाजी करताना चेंडू चांगल्या पद्धतीने टोलवतो. गेल्या काही सामन्यात मी त्याची फलंदाजी पाहिली असून त्याची कामगिरी उत्तम आहे. त्यामुळे तो भारताच्या संघासाठी उपयुक्त खेळाडू आहे, असेही मॅक्युलमने सांगितले.