डावखुरा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने अखेरीस विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पदार्पण केलं आहे. चौथ्या क्रमांकावर विजय शंकरला विश्रांती देत भारतीय संघ व्यवस्थापनाने पंतला संधी दिली आहे. मात्र कर्णधार विराट कोहलीचा हा निर्णय माजी फिरकीपटू मुरली कार्तिकला पटला नाहीये. कार्तिकने व्यक्त केलेल्या मतानुसार, पंत ऐवजी दिनेश कार्तिकला संघात जागा मिळायला हवी होती. याचसोबत कार्तिकने कर्णधार विराट कोहलीलाही टोला लगावला आहे.

अवश्य वाचा – World Cup 2019 : ऋषभ पंतने सलामीला फलंदाजीसाठी यावं का? सेहवाग म्हणतो….

“मी दिनेश कार्तिकची संघात निवड केली असती. माझ्यादृष्टीने सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, काही दिवसांपूर्वी विराट कोहली विजय शंकरचं समर्थन करत होता. तो लवकरच फॉर्मात परतेल असं विराटचं म्हणणं होतं. काही दिवसांपूर्वी अंबाती रायुडूसोबत हाच प्रकार घडला. चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजाला वगळलं जातंय. माझ्या मते ही कृती योग्य नाही, मला या निर्णयामुळे धक्का बसला आहे.” मुरली कार्तिक ESPNCricinfo संकेतस्थळाशी बोलत होता.

ऋषभ हा आक्रमक खेळाडू आहे याची मला कल्पना आहे. मात्र गेल्या वर्षभरात वन-डे क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी फारशी दखल घेण्यासारखी नाहीये. जर नवोदीत खेळाडूंना आपण चुकीचे पायंडे पाडून दिले, तर भविष्यकाळात नवीन खेळाडू संघात समाविष्ट होण्यासाठी तुमच्याकडे खेळाव्यतिरीक्त इतर गोष्टी असणं गरजेचं आहे असा समज करुन देतील. मुरली कार्तिकने भारताच्या संघनिवडीवर टीका केली. त्यामुळे आजच्या सामन्यात ऋषभ पंत फलंदाजीमध्ये कसा खेळ करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader