भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर खेळत असताना, चेंडू शिखरच्या अंगठ्याला लागला. वैद्यकीय तपासणीमध्ये शिखरला फ्रॅक्चर झाल्याचं समोर आलं. सुरुवातीला शिखरला वैद्यकीय टीमच्या देखरेखीखाली इंग्लंडमध्ये संघासोबत राहण्याची परवानगी दिली. पर्यायी खेळाडू म्हणून ऋषभ पंतला इंग्लंडमध्ये पाचारण करण्यात आलं होतं.

अवश्य वाचा – World Cup 2019 : भारतीय संघाला धक्का, शिखर धवन स्पर्धेमधून बाहेर

अखेरीस शिखरची दुखापत बरी होणार नसल्याचं समोर येताच, बीसीसीआयने धवनच्या संघातून बाहेर जाण्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब केलं आहे. ऋषभच्या जागी डावखुरा फलंदाज ऋषभ पंतला भारतीय संघात जागा देण्यात आली आहे. नवोदीत ऋषभ पंतचा हा पहिला विश्वचषक असणार आहे. शिखर धवन हा डावखुरा फलंदाज आहे, विश्वचषक स्पर्धेत १५ खेळाडूंच्या संघात एकूण ३ डावखुरे फलंदाज आहेत. त्यापैकी सध्याच्या अंतिम ११ च्या संघात २ फलंदाज खेळत असून त्यातही एक फलंदाज हा कुलदीप यादव आहे. त्याला फलंदाजीचा फारसा अनुभव नाही. याशिवाय राखीव ४ खेळाडूंमध्ये रवींद्र जाडेजा हा एकमेव डावखुरा फलंदाज आहे. पण जाडेजा हा सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजीस उतरणारा खेळाडू आहे. अशा परिस्थितीत पहिल्या ६ फलंदाजांमध्ये असलेला समतोल कायम ठेवण्यासाठी डावखुऱ्या फलंदाजाच्या जागी डावखुरा फलंदाज म्हणून सध्या ऋषभ पंतची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.

विश्वचषक संघाची घोषणा करण्याच्या दरम्यान अनेक क्रीडाप्रेमींनी ऋषभ पंतला, धोनीला पर्यायी यष्टीरक्षक म्हणून संघात जागा मिळेल अशी आशा व्यक्त केली होती. मात्र एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीने ऋषभ पंत ऐवजी दिनेश कार्तिकला पसंती दर्शवली. त्याआधी झालेल्या आयपीएल स्पर्धेत ऋषभ पंतने दिल्लीकडून खेळताना चांगली फलंदाजी केली होती. मात्र अंतिम संघात निवड न झाल्यामुळे आपल्याला वाईट वाटल्याचंही ऋषभने बोलून दाखवलं होतं.

अखेरीस ऋषभ पंतने इतके दिवस दाखवलेल्या संयमाचं फळ त्याला मिळालं आहे. १५ जणांच्या संघात स्थान मिळालं असलं तरीही अंतिम ११ जणांच्या संघात ऋषभ पंतला संधी मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. शिखर धवनच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल सलामीच्या जागेवर चांगली कामगिरी करतो आहे. विजय शंकरने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करुन आपलं अष्टपैलू खेळाडू असल्याचं दाखवून दिलं आहे. आगामी काळात इंग्लंडचा अपवाद वगळता भारतासमोर तुल्यबळ प्रतिस्पर्ध्याचं आव्हान नाहीये, त्यामुळे एखाद्या सामन्यात विराट कोहली आणि भारतीय संघ व्यवस्थापन ऋषभ पंतला संधी देतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader