भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताला विजय मिळवून दिला. रोहितने पहिल्या सामन्यात शतकी खेळी करत दक्षिण आफ्रिकेने दिलेलं २२८ धावांचं आव्हान सहज पूर्ण करण्यास संघाला मदत केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्याआधी रोहित शर्माने उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रोहितला त्याच्या खेळाबद्दल विचारलं असता, “मी २०० पेक्षा अधिक वन-डे सामने खेळलो आहे. त्यामुळे आता जबाबदारीने खेळलो नाही, तर अनुभवाचा काय फायदा”, असं रोहित शर्माने म्हटलं आहे.

“अनुभव तुम्हाला अनेक गोष्टी शिकवून जातो. माझ्या खेळामध्ये ही बाब जरा उशीराने आली. पण तुम्ही एखाद्या सामन्यात चांगली सुरुवात करता आणि तुमच्या खेळीमुळे संघ विजयी होतो ही भावना कोणत्याही खेळाडूसाठी अभिमानास्पद आहे. शतक झळकावून तुम्ही संघाला विजय मिळवून देऊ शकलात नाही तर ती गोष्ट एक खेळाडू म्हणून स्वतःला रुचत नाही. पण सुदैवाने पहिल्या सामन्यात मी संघाला विजयापर्यंत आणू शकलो याचा मला आनंद आहे.” रोहित शर्मा आपल्या उप-कर्णधारपदाच्या जबाबदारी आणि खेळाबद्दल बोलत होता.

पहिल्याच सामन्यात भारतीय गोलंदाजांनी सुरेख मारा करत दक्षिण आफ्रिकेला २२७ धावांमध्ये रोखलं. यानंतर रोहित शर्माच्या शतकी खेळाच्या जोरावर भारताने पहिला सामना ६ गडी राखून जिंकला. त्यामुळे यापुढील सामन्यांमध्ये रोहित शर्माची आणि भारतीय संघाची कामगिरी कशी राहते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader