पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने भारताचा यष्टीरक्षक आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. क्रिकेटच्या मैदानात महेंद्रसिंह धोनी कॉम्प्युटरपेक्षाही वेगवान असल्याचं शोएबने म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्यात धोनीने रोहित शर्मासोबत महत्वाची भागीदारी रचत संघाच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला.
आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यानंतर शोएबने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर धोनीचं कौतुक केलं आहे. “एखाद्या खेळपट्टीवर कसं खेळावं यासाठी कॉम्प्युटर तुम्हाला वेगवेगळे सल्ले देईल, पण माझ्या मते धोनी कॉम्प्युटरपेक्षाही वेगवान आहे.” पहिल्या सामन्यात भारताने आफ्रिकेवर ६ गडी राखून मात दिली. फलंदाजीमध्ये रोहित शर्माला साथ देण्यासोबत धोनीने यष्टीरक्षणातही आपली चमक दाखवली.
पहिल्या सामन्यात धोनीने यष्टीरक्षण करताना ग्लोव्ह्जवर लावलेल्या लष्कराच्या बलिदान चिन्हावरुन सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. ९ जून रोजी भारताचा सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध होणार आहे.