दीपक जोशी
हॅम्पशायरमधील साऊदम्पटन येथे पाच सामने खेळवण्यात येणार आहेत. यापैकी पहिला सामना दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात बुधवारी होणार आहे. या मैदानावरील तीन सामने खेळणाऱ्या भारताने एक विजय व दोन पराजय पत्करले आहेत. परंतु दोन सामन्यांत अपयशी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या मैदानावर प्रथमच भारत सामना करीत आहे. भारताने विश्वचषकात आतापर्यंत ११ पैकी पाच सामन्यांत विजयी सलामी दिली आहे, तर पाच सामने गमावले आहेत. चौथा विश्वचषक खेळणारा महेंद्रसिंह धोनी (२० सामने) आणि विश्वचषकात प्रथमच नेतृत्व करणारा विराट कोहली (१७ सामने) यांच्यावर भारताची प्रमुख मदार असेल. भारताने विश्वचषकामधील ७५ सामन्यांमध्ये ४६ विजय मिळवले असून, विजयांचे अर्धशतक साकारण्यासाठी आणखी चार विजयांची आवश्यकता आहे. २२७ सामने खेळणारा कोहली अर्धशतकांचा सुवर्णमहोत्सव साजरा करू शकतो. त्याला आणखी एका अर्धशतकाची आवश्यकता आहे. याचप्रमाणे २०७ सामने खेळणाऱ्या रोहित शर्माला झेलचे पाऊणशतक साकारण्यासाठी दोन झेलची गरज आहे.