विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ५ जून रोजी भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार आहे. मात्र त्याआधी झालेल्या पहिल्याच सराव सामन्यात भारताची फलंदाजी कोलमडली. रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली हे भारताचे बिनीचे शिलेदार न्यूझीलंडविरुद्ध सराव सामन्यात झटपट माघारी परतले. चौथ्या क्रमांकावर संधी मिळालेला लोकेश राहुलही फारशी चमक दाखवू शकला नाही. भारताकडून मधल्या फळीत हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा यांनी थोडीफार झुंज दिली. या सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीने आपल्या तळातल्या फळीतल्या खेळाडूंकडून फलंदाजीमध्येही आपला दमखम दाखवावा अशी अपेक्षा केली आहे.

“विश्वचषकासारख्या स्पर्धेत कधीकधी तुमचे सुरुवातीच्या फळीतले फलंदाज हे अपयशी ठरतात. अशावेळी तळातल्या खेळाडूंनी फलंदाजीची जबाबदारी घेणं गरजेचं आहे. पहिल्या सराव सामन्यात आम्ही ठरवलेल्या गोष्टी मैदानात घडून आल्याच नाहीत. मात्र मधल्या फळीत हार्दिक, जाडेजा, धोनीने काही धावा काढल्या ही आमच्यासाठी सकारात्मक बाब आहे. ४/५० या धावसंख्येवरुन १७९ पर्यंत मजल मारणं ही माझ्यासाठी आश्वासक बाब आहे.” सामना संपल्यानंतर विराट कोहलीने आपलं मत मांडलं.

दरम्यान, रविंद्र जाडेजाचा (५४) अपवाद वगळता भारताच्या अन्य फलंदाजांनी सपशेल निराशा केली. जाडेजाच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताला १७९ धावांचा टप्पा गाठता आला. अर्धशतकी खेळीत जाडेजाने सहा चौकार आणि दोन षटकार लगावले. कर्णधार विराट कोहलीसह सलमीवीर रोहित शर्मा, शिखर धवन आणि लोकेश राहुल स्वस्तात बाद झाले.

हार्दिक पांडयाने (३०) थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. एम एस धोनी (१७) आणि दिनेश कार्तिक (४) फारशी चमक दाखवू शकले नाहीत. पांडया आणि कार्तिकला नीशामने तर धोनीला साऊदीने बाद केले. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बाऊल्टने भेदक मारा करत रोहित (२), शिखर (२) आणि राहुलला (६) स्वस्तात बाद केले.

अवश्य वाचा – टीम इंडियावरचं संकट टळलं, विजय शंकरची दुखापत गंभीर नाही

Story img Loader