ICC World Cup 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३आधी ऑस्ट्रेलिया संघ व्यवस्थापनाने रविचंद्रन अश्विनच्या डुप्लिकेट महेश पिठियाला सराव सत्रादरम्यान गोलंदाजीसाठी बोलावले. मात्र, पिठियाने ऑस्ट्रेलियाची ही ऑफर नाकारली आहे. वास्तविक, महेश पिठिया भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये बडोद्याकडून खेळतो आणि महेशने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीदरम्यान ऑस्ट्रेलियन कॅम्पमध्ये काम केले होते. अक्षर पटेल वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर अश्विनची निवड करण्यात आली, त्यानंतर महेशला ही ऑफर मिळाली. महेशची गोलंदाजीची अॅक्शन ही आर. अश्विनसारखीच आहे.
महेश पिठिया याने स्पोर्टस्टारशी बोलताना सांगितले की, “ही निश्चितच एक आश्चर्यचकित करणारी ऑफर होती, परंतु नंतर पुन्हा आगामी विश्वचषक २०२३ हा भारतात होणार आहे असा विचार केला. तसेच, मी देखील पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या देशांतर्गत हंगामासाठी बडोदा संघाचा भाग आहे. त्यामुळेच, मी या ऑफरबद्दल विचार केला, आमच्या प्रशिक्षकाशी बोललो आणि त्यांना कळवले की मला यावेळी शिबिरात उपस्थित राहणे शक्य होणार नाही.”
महेश पुढे म्हणाले की, “बीसीसीआयने अक्षराच्या जागी अश्विनची घोषणा करताच मला फोन आला. आंतरराष्ट्रीय संघांबरोबर काम करणे नेहमीच अनुभव देणारी बाब असते, पण माझे प्राधान्य देशांतर्गत क्रिकेटला आणि भारतीय संघाला असते. बडोद्या संघाकडून खेळल्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे. या दीर्घ हंगामापूर्वी मला वाटले की, मी माझ्या खेळावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि ऑस्ट्रेलियन संघाच्या सराव शिबिरात सहभागी होऊ नये.”
अक्षरऐवजी अश्विनला संधी मिळाली आहे
अक्षर पटेल दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर बीसीसीआयने आर अश्विनचा संघात समावेश केला आहे. मात्र, आर अश्विनप्रमाणे महेश पिठिया देखील ऑस्पिन गोलंदाजी करतो आणि दोघांची गोलंदाजी सारखीच आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलियाने महेशला ऑफर दिली होती. मात्र आपल्या प्रशिक्षकाचा सल्ला घेतल्यानंतर त्याने कांगारूंचा हा प्रस्ताव नाकारला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सराव सामना पावसामुळे रद्द
विश्वचषक स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी सर्व संघ सराव सामन्यात सहभागी होत आहेत. गुवाहाटी येथे शनिवारी (३० सप्टेंबर) भारत आणि इंग्लंड यांच्यातील सराव सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यानंतर हवामान खराब झाल्याने खेळ सुरू होऊ शकला नाही. सततच्या पावसामुळे अंपायर्सनी बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर सामना रद्द झाल्याचे घोषित केले.