विश्वचषक-२०२३ च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाने भारतावर सहा गडी राखून विजय मिळवत सहाव्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय खेळाडूंसह क्रिकेट चाहत्यांची निराशा झाली आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मासह अनेक खेळाडूंचे डोळे पाणवले होते. भारताने सलग १० विजय मिळवत संपूर्ण वर्लकपमध्ये वर्चस्व गाजवलं होतं. पण अखेरच्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला.
आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर पोस्ट करत भारतीय खेळांडूंचं मनोबल उचवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच सचिनने विजयी संघाचं अभिनंदनही केलं आहे. पराभव हा खेळाचा एक भाग आहे. परंतु भारतीय संघाने संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत आपलं सर्वस्व दिलं आहे, हे कायम लक्षात राहीन, अशा शब्दांत सचिनने टीम इंडियाचं सांत्वन केलं आहे.
हेही वाचा- विराट आणि राहुलच्या फलंदाजीवर सेहवागची नाराजी; म्हणाला, “त्यांनी एकही…”
‘एक्स’वर लिहिलेल्या पोस्टमध्ये सचिन म्हणाला, “सहाव्या विश्वकप विजयासाठी ऑस्ट्रेलियन संघाचे अभिनंदन. विश्वचषकाच्या सर्वात मोठ्या सामन्यात आणि सर्वात महत्त्वाच्या दिवशी त्यांनी चांगली खेळी केली. टीम इंडियासाठी शुभेच्छा, भारतीय संघाने पूर्ण विश्वचषक स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केली. मात्र कालचा एक दिवस हृदयद्रावक ठरला. यामुळे खेळाडू, चाहते आणि हितचिंतक यांच्या यातना आणि त्यांना काय त्रास होत असेल याची मी कल्पना करू शकतो. पराभव हा खेळाचा एक भाग आहे. परंतु भारतीय संघाने संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत आपलं सर्वस्व दिलं आहे, हे कायम लक्षात राहीन.”