India vs Australia ICC Cricket World Cup 2023 Match Updates : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी विश्वचषका २०२३चा अंतिम सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी ९ दिग्गज क्रिकेटपटूंनी भारताच्या विजयाचा अंदाज वर्तवला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या दोन माजी कर्णधारांचा समावेश आहे. शेन वॉटसन आणि ॲरॉन फिंच यांनी भारताच्या विजयाचा दावा केला आहे. टीम इंडिया सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असल्याचे वॉटसनने म्हटले आहे. त्यांचे फलंदाज आणि गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. त्यांना रोखणे ऑस्ट्रेलियासाठी खूप कठीण जाईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वॉटसन आणि फिंच काय म्हणाले?

ऑस्ट्रेलियाचा आणखी एक माजी कर्णधार ॲरॉन फिंचनेही भारतीय संघाच्या विजयाचा दावा केला आहे. या विश्वचषकात भारताने अविश्वसनीय क्रिकेट खेळले आहे, त्यामुळे फायनलमध्ये टीम इंडिया मजबूत दिसत असल्याचे त्याने म्हटले आहे. वॉटसन आणि फिंच व्यतिरिक्त इम्रान ताहिरने रोमांचक फायनल पाहायला मिळेल असे म्हटले आहे, पण टीम इंडिया प्रबळ दावेदार आहे. भारताने प्रत्येक विभागात चमकदार कामगिरी केली आहे. तुम्ही मला विचाराल तर मी ‘ब्रँड ऑफ क्रिकेट’ म्हणून भारताची निवड करेन.

हेही वाचा – IND vs AUS Final: भारतीय क्रिकेटपटूंच्या मनगटावर असलेले ‘हे’ डिव्हाइस काय आहे? जाणून घ्या सर्वकाही सविस्तर

या दिग्गजांनीही भारताला मानले प्रबळ दावेदार

याशिवाय मायकेल वॉन, इयान बिशप, पार्थिव पटेल, गौतम गंभीर, दिनेश कार्तिक आणि इरफान पठाण यांनीही अंतिम फेरीत टीम इंडियाच्या विजयाचा दावा केला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २० वर्षांनंतर वर्ल्ड कप फायनल होणार आहे. यापूर्वी २००३ च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले होते. तेथे ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत ३५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ २३४ धावांवर गारद झाला होता.

हेही वाचा – IND vs AUS Final: अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित आणि विराटपेक्षा ‘हा’ भारतीय फलंदाज ठरू शकतो जास्त धोकादायक!

ऑस्ट्रेलिया संघ विश्वचषक विजेता ठरेल – शोएब मलिक

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ ए स्पोर्ट्स चॅनलच्या एका कार्यक्रमातील आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू शोएब मलिक याने ए स्पोर्ट्स चॅनलच्या एका कार्यक्रमात बोलताना विश्वचषक २०२३ चे विजेतेपद जिंकणाऱ्या संघाचे नाव सांगितले. तो म्हणाला की ऑस्ट्रेलियन संघ ज्या पद्धतीने मोठ्या सामन्यांमध्ये खेळतो, त्यामुळे पुन्हा एकदा वरचढ ठरून विश्वचषक जिंकू शकतो. शोएब मलिकला आपले भाकीत वर्तवण्यासाठी सांगितले असता, तो म्हणाला, ‘ऑस्ट्रेलिया संघ विश्वचषक विजेता ठरेल.’

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World cup 2023 final ind vs aus 9 prediction india win and 1 aus win including two former australian captain vbm