ICC World Cup 2023: सध्याच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. त्याने पाचपैकी पाच सामने जिंकले आहेत. गुणतालिकेमध्ये टीम इंडिया पहिल्या स्थानावर आहे. त्याला त्याचा पुढील सामना रविवारी (२९ ऑक्टोबर) इंग्लंडविरुद्ध खेळायचा आहे. त्यानंतर संघ २ नोव्हेंबरला श्रीलंकेशी आणि ५ नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे अष्टपैलू हार्दिक पांड्या अद्याप तंदुरुस्त नसल्यामुळे तो पुढील काही सामन्यांमध्ये खेळेल याबाबत साशंकता आहे.
१९ ऑक्टोबर रोजी पुण्यात बांगलादेशविरुद्ध गोलंदाजी करताना हार्दिक पांड्या चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात खाली घसरला आणि दुखापतग्रस्त झाला. २२ ऑक्टोबर रोजी धरमशाला येथे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नाही. पांड्याने दुखापतीच्या व्यवस्थापनासाठी सोमवारी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडे (एनसीए) धाव घेतली होती. आता तो इंग्लंड, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यांत खेळण्याची शक्यता फार कमी आहे.
वैद्यकीय पथक हार्दिकवर लक्ष ठेवून आहे
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिकच्या घोट्यात ग्रेड १ लिगामेंट फाटले आहे. सूज खूप वाढली असून त्यामुळे त्यांना वेदनाही होत आहेत. मात्र, चांगली गोष्ट म्हणजे हार्दिकला फ्रॅक्चर झालेले नाही. एनसीएच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पांड्याची दुखापत गंभीर असू शकते. एनसीएमधील नितीन पटेल यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. हार्दिकला बरे होण्यासाठी दोन आठवडे लागू शकतात. तो पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतरच एनसीए त्याला सोडणार आहे.
सूर्यकुमार यादवचा मार्ग मोकळा
हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे सूर्यकुमार यादवचा पुढील काही सामन्यात संघात खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता गोलंदाजीत रोहित शर्मासमोर काय काय पर्याय आहेत? यावर संघ व्यवस्थापन विचार करत आहेत. मोहम्मद शमीने न्यूझीलंडच्या सामन्यात पाच विकेट्स घेत संघातील जागा पक्की केली आहे. सिराज, जडेजा आणि कुलदीप यांना प्लेईंग-११मध्ये स्थान असेलच मात्र, अश्विन आणि शार्दुल ठाकूर यांना देखील परिस्थितीनुसार संघात मिळू शकते.
हार्दिकच्या बदलीचा विचार केला जात नाही
भारतीय संघ व्यवस्थापनाला एनसीएच्या वैद्यकीय पथकाकडून सांगण्यात आले आहे की त्यांना लवकरच मैदानात परत येण्याची आशा आहे. हार्दिकच्या जागी संघात अन्य कोणत्याही खेळाडूचा समावेश करण्याचा विचार सध्या संघ करत नाही. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड त्याची वाट पाहत आहेत.
टीम इंडिया लखनऊला पोहोचली आहे
टीम इंडिया बुधवारी लखनऊला पोहोचली असून गुरुवारपासून सरावला देखील सुरुवात झाली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पुढील दोन सामन्यांसाठीही हार्दिकची उपलब्धता संशयास्पद आहे. हार्दिकच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याच्या शरीरावर वेगवेगळ्या जखमा झाल्या आहेत आणि त्यातूनही तो सावरला आहे.