मुंबई : सलग नऊ सामन्यांत विजय मिळवणाऱ्या यजमान भारतीय संघाचा सामना ‘आयसीसी’ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात बुधवारी न्यूझीलंड संघाशी होणार आहे. संपूर्ण स्पर्धेत भारताने आपली विजयी लय कायम राखली आहे आणि उपांत्य सामन्यात त्यांचा प्रयत्न याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा राहील. विश्वचषक भारतात होत असल्याने भारतीय संघाकडून भक्कम कामगिरीची अपेक्षा होती आणि संघानेही निराश न करता सातत्यपूर्ण कामगिरी करताना उपांत्य फेरी गाठली. भारतीय संघ गुणतालिकेत १८ गुणांसह अग्रस्थानी राहिला, तर न्यूझीलंड संघाने निर्णायक क्षणी आपली कामगिरी उंचावत उपांत्य सामन्यात स्थान मिळवले. विश्वचषकाच्या गेल्या दोन सत्रांतील उपविजेत्या न्यूूझीलंड संघाला कमी लेखण्याची चूक भारत करणार नाही.
भारतीय संघाने विश्वचषकात अपेक्षेनुसार कामगिरी केली आहे. फलंदाजी व गोलंदाजी सर्वच आघाडय़ांवर संघाने चमक दाखवली आहे. विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या दहा जणांमध्ये भारताचे तीन फलंदाज आहे. भारताकडून विराट कोहलीने (५९४ धावा) सर्वाधिक धावा केल्या आहे. यासह कर्णधार रोहित शर्मा (५०३) व श्रेयस अय्यर (४२१) यांनी स्पर्धेत चुणूक दाखवली आहे. गोलंदाजी विभागातही भारतीय खेळाडूंनी छाप पाडली. जसप्रीत बुमरा (१७ बळी), रवींद्र जडेजा (१६ बळी), मोहम्मद शमी (१६ बळी) आणि कुलदीप यादव (१४ बळी) यांनी चमक दाखवली आहे. वानखेडेच्या खेळपट्टीवर झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी लक्ष वेधले होते.
भारताच्या रोहित, शुभमन गिल, विराट, श्रेयस आणि केएल राहुल या शीर्ष पाच फलंदाजांनी आतापर्यंतच्या संघाच्या वाटचालीमध्ये निर्णायक भूमिका पार पाडली होती. अष्टपैलू हार्दिक पंडय़ा जायबंदी झाल्यानंतर संघातील खेळाडूंनी त्याची उणीव जाणवू दिली नाही. त्यामुळे या सामन्यात भारताचे पारडे जड समजले जात आहे. दुसरीकडे, न्यूझीलंड संघाने चांगल्या सुरुवातीनंतर लय गमावली. मात्र, वेळीच कामगिरी उंचावत त्यांनी उपांत्य फेरीतील आपले निश्चित केले. केन विल्यम्सनही दुखापतीतून सावरला असून युवा रचिन रवींद्रने आपल्या कामगिरीने सर्वाचे लक्ष वेधले. रचिन सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ५६५ धावांसह तिसऱ्या स्थानी आहे. या निर्णायक सामन्यातही संघाला त्याच्याकडून अपेक्षा असतील. यासह संघाकडे चांगल्या अष्टपैलूंचा समावेश आहे. त्यामुळे भारताला न्यूझीलंडकडून चांगले आव्हान मिळण्याची शक्यता आहे. भारताने साखळी सामन्यात न्यूझीलंडचा विजयरथ रोखला होता. उपांत्य सामन्यात पुन्हा एकदा भारताचा प्रयत्न विजय मिळवण्याचा असेल.
’ वेळ : दु. २ वा.
’ थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, २, हॉटस्टार अॅप