India vs Pakistan, World Cup 2023: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषक सामन्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. शेड्यूलनुसार, दोघांमध्ये १५ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना होणार होता, मात्र नवरात्रीमुळे त्यात बदल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता हा सामना १४ ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. तारखेतील बदलाबाबत अलीकडेच सुरक्षा यंत्रणांनी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. स्टेडियमची क्षमता एक लाख असून नवरात्रीचा पहिला दिवस असल्याने गुजरातमध्ये अनेक ठिकाणी गरब्याचे कार्यक्रम होतात. अशा परिस्थितीत स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणावर दिल्या जाणाऱ्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. बीसीसीआय आणि आयसीसी लवकरच नवीन तारखेची घोषणा करू शकतात.
या सामन्यावर जय शाह यांनीही मोठं वक्तव्य केलं आहे
टीव्ही टुडेच्या बातमीनुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आता एक दिवस आधी १४ ऑक्टोबरला खेळवला जाऊ शकतो. याशिवाय आणखी अनेक सामन्यांच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतात. अलीकडेच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले होते की, “तीन देशांनी आयसीसीला पत्र लिहून वेळापत्रकात बदल करण्याची मागणी केली होती. मात्र, सामन्याच्या ठिकाणी कोणताही बदल करण्यात आलेला नाही.” एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक पाहिल्यास ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत सामने खेळवले जाणार आहेत. यात एकूण १० संघ प्रवेश करत असून ४८ सामने खेळवले जाणार आहेत. याबाबतची अधिकृत माहिती ३१ जुलै रोजी दिली जाणार आहे.
१४ ऑक्टोबर रोजी २ सामने आधीच ठरलेले आहेत
एकदिवसीय विश्वचषकाच्या वेळापत्रकाबद्दल बोलायचे झाल्यास, १४ ऑक्टोबर रोजी दोन सामने आधीच प्रस्तावित आहेत. अशा स्थितीत त्यादिवशी ३ सामने होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. न्यूझीलंड आणि बांगलादेश चेन्नई येथे दिवसाच्या सामन्यात भिडतील. दुसरीकडे, १४ ऑक्टोबरला दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांच्यात दिल्लीत सामना होणार आहे. या सामन्यातही बदल शक्य आहेत. भारतीय संघ आठ ऑक्टोबरपासून या स्पर्धेत पदार्पण करणार आहे. पहिल्या सामन्यात त्याला चेन्नईत ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे.
नवरात्रीमुळे वेळापत्रकात बदल होणार आहे
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा महामुकाबला आता एक दिवस आधी म्हणजेच १४ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. याशिवाय वर्ल्ड कपच्या वेळापत्रकात आणखी काही बदल होणार आहेत. हे सर्व बदल आज (३१जुलै) रोजी जाहीर केली जातील. नवरात्रोत्सवानिमित्त हा सर्व बदल करण्यात येत आहे. नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस १५ ऑक्टोबरला येत आहे. गुजरातआमध्ये नवरात्रोत्सव जोरदार साजरा केला जातो. तिथे दांडिया, गरबा खेळला जातो. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी बीसीसीआयला पत्र पाठवून विनंती केली होती की, सामन्याची तारीखेत तुम्ही बदल करावा. कारण त्या सामन्याला खूप प्रेक्षक येतील आणि त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल.
येथे समजून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे विश्वचषकादरम्यान केवळ नवरात्रोत्सवच नाही तर दिवाळी, दसरा हे सणही येणार आहेत. अशा परिस्थितीत बीसीसीआयला विश्वचषक पार पाडण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.