मुंबई : मोहम्मद शमी सध्याच्या घडीला सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक असून भारत हा जगातील सर्वोत्तम संघ असल्याचे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन विश्वचषकातील उपांत्य सामन्यानंतर म्हणाला. भारताने न्यूझीलंडला ७० धावांनी नमवत अंतिम फेरीत स्थान मिळवले. शमीने या सामन्यात सात गडी बाद केले आणि विश्वचषक स्पर्धेत तिसऱ्यांदा पाच बळी मिळवण्याची किमया साधली.
हेही वाचा >>> VIDEO: ‘मुंबई का भाई कौन? रोहित-रोहित’; टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी
‘‘शमीची कामगिरी कौतुकास्पद आहे. त्याने कदाचित अर्धे सामने खेळले आहेत, तरीही स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो अव्वल आहे. तो जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. शमीची गोलंदाजी अद्भुत होती. भारतीय संघ प्रत्येक विभागात दर्जेदार कामगिरी करत आहे. सध्या भारतीय संघ जगातील सर्वोत्तम संघ आहे आणि त्यांचे सर्व खेळाडू आपली सर्वोत्तम कामगिरी करताना दिसत आहेत,’’ असे विल्यम्सनने सांगितले. विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५०वे शतक झळकावताना सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला. याबाबत विल्यम्सन म्हणाला, ‘‘कोहलीच्या कामगिरीबाबत बोलण्यासाठी शब्द अपुरे पडतील. तो दिवसेंदिवस चांगला खेळ करताना दिसत आहे, जो प्रतिस्पर्धी संघासाठी चिंतेचा विषय आहे.’’