Mohammad Rizwan Pakistan Team : विश्वचषक स्पर्धेतील भारताविरुद्धचा पराभव पाकिस्तानच्या जिव्हारी लागला आहे. स्पर्धेत पाकिस्तानने सलग दोन विजयांसह दणक्यात सुरुवात केली होती. परंतु, तिसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तानच्या क्रिकेट संघावर पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. पाकिस्तानी संघाची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पाकिस्तानच्या काही माजी क्रिकेटपटूंनी तर थेट बाबर आझमला कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी केली आहे. प्रसारमाध्यमं, समाजमाध्यमांवर टीका सुरू असतानाच पाकिस्तानच्या संघातील यष्टीरक्षक आणि भरवशाचा फलंदाज मोहम्मद रिझवाननेदेखील संघातील काही उणिवा स्वीकारल्या आहेत.

मोहम्मद रिझवानने मान्य केलं आहे की त्यांच्या संघात काही कमतरता आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी रिझवानने मोठं वक्तव्य केलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोहम्मद रिझवानच्या मुलाखतीचा काही भाग एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. यामध्ये रिझवानने सांगितलं आहे की, पाकिस्तानच्या संघाला नेमकं काय करण्याची गरज आहे.

मोहम्मद रिझवानच्या मते मैदानातल्या परिस्थितीनुसार आपला खेळ खेळणं आणि गरजेनुसार खेळ बदलणं याची खेळाडूंना नीट कल्पना असली पाहिजे. याशिवाय संघाला क्षेत्ररक्षणात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. चेंडू अडवणं असो अथवा झेलणं, दोन्ही बाबतीत संघात अजून सुधारणा होऊ शकते. आमचे फिरकीपटू मधल्या षटकांमध्ये बळी घेऊ शकले नाहीत. ते चांगली गोलंदाजी करत आहेत. परंतु, खेळपट्टीवर जम बसवलेल्या फलंदाजाला बाद करणं खूप गरजेचं असतं.

हे ही वाचा >> IND vs BAN, World Cup: बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट कोहलीने टीम इंडियाला दिला सल्ला; म्हणाला, “हलक्यात घेऊ नका…”

दरम्यान, भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानी संघातील काही खेळाडू तापाने आजारी पडले होते. त्यातले काही खेळाडू आता बरे झाले असून सराव करू लागले आहेत. परंतु, दोन खेळाडू अजूनही गंभीर आहेत. त्यापैकी एकाला खूप ताप असून त्याच्यावर पाकिस्तानचे संघ व्यवस्थापन लक्ष ठेवून आहे. पाकिस्तानला आपला पुढचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे आणि अशातच संघासाठी ही वाईट बातमी समोर आल्याने कर्णधार बाबर आझमच्या चिंतेत भर पडली आहे. परंतु, संघव्यवस्थापनाने त्या दोन खेळाडूंची नावं सांगण्यास नकार दिला आहे.

Story img Loader