IS Pakistan Out of World Cup 2023: पाकिस्तानचा सलग चौथा पराभव पाहता आता विश्वचषक २०२३ मधील पाक संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे का असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. कालच्या सामन्यात विजयी होऊन मिळणारे दोन पॉईंट्स पाकिस्तानसाठी किती आवश्यक आहेत हे बाबर आझम व संघाच्या खेळीतून दिसत होते, मात्र अवघ्या एका विकेटच्या फरकाने पाकिस्तानने चौथा पराभव आपल्या नावे केला.
उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी पाकिस्तानला विजयाची गरज होती. मात्र, पराभवानंतरही पाकिस्तान टॉप 4 च्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडलेला नाही.दक्षिण आफ्रिकेने भारताला मागे टाकून विश्वचषक २०२३ च्या गुणतालिकेत ६ सामन्यांतून १० गुण मिळवत टॉपला स्वतःची जागा तयार केली आहे. न्यूझीलंड ८ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे तर ऑस्ट्रेलिया ६ गुणांसह अव्वल चौथ्या स्थानावर आहे. उद्या भारत विरुद्ध इंग्लड सामन्यात भारत विजयी झाल्यास हे चित्र पुन्हा बदलूही शकते.
पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी कसा पात्र ठरू शकतो?
पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचणे हे त्यांच्या स्वतःच्या हातात नाही. मुख्यतः इतर संघ कसे खेळतात यावर त्यांचे विश्वचषकातील भविष्य अवलंबून आहे. पण तत्पूर्वी पाकिस्तानला स्वतः पराभवाची मालिका मोडावी लागणार आहे. पाकिस्तानला त्याचे उर्वरित तीन सामने मोठ्या फरकाने जिंकून नेट रन रेटच्या शर्यतीत आपली जागा पुढे ठेवावी लागेल.
यापुढील पाकिस्तानचा सामना हा ३१ ऑक्टोबरला कोलकाता येथे बांगलादेशविरुद्ध सामना होईल. त्यानंतर लीग टप्प्यात आणखी दोन कठीण सामने आहेत. ४ नोव्हेंबर रोजी २०१९ च्या उपविजेत्या न्यूझीलंड आणि ११ नोव्हेंबर रोजी इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानला आपले अस्तित्व टिकवून ठेवायचे आहे.
पाकिस्तानचं भविष्य ऑस्ट्रेलियाच्या हातात..
पाकिस्तानला पुढे जाण्यासाठी ऑस्ट्रेलियाने पुढील ४ पैकी ३ सामने गमावणे आवश्यक आहे. पण ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव केल्यास पाकिस्तानचा अधिक फायदा होऊ शकतो. कारण यामुळे ऑस्ट्रेलियाचे ८ गुण असतील आणि पाकिस्तानचे १० गुण असतील. अगदी ऑस्ट्रेलियाने चार पैकी २ सामने जरी गमावले तरीही नेट रन रेटच्या आधाराने पाकिस्तान पुढे जाऊ शकते.
ऑस्ट्रेलियाचे उर्वरित सामने
२८ ऑक्टोबर, न्यूझीलंड विरुद्ध
४ नोव्हेंबर, इंग्लंड विरुद्ध
७ नोव्हेंबर, अफगाणिस्तान विरुद्ध
११ नोव्हेंबर बांगलादेश विरुद्ध
न्यूझीलंडमुळे पाकिस्तानला कशी होईल मदत?
न्यूझीलंडने त्यांचे उर्वरित सर्व सामने गमावले आणि श्रीलंका आणि अफगाणिस्तानने त्यांच्या पुढील ४ पैकी किमान २ सामने गमावले तर पाकिस्तानला पुढे जाण्याची संधी मिळू शकते. ४ नोव्हेंबरला पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंडने सामन्यात जर पाकिस्तान विजयी ठरला तर न्यूझीलंडचे फक्त ८ गुण असतील आणि पाकिस्तानचे १० गुण असतील. न्यूझीलंडशी 10-पॉइंटने बरोबरी झाल्यास, पाकिस्तानला नेट रन रेटची मोठी मदत होऊ शकते.
न्यूझीलंडचे उर्वरित सामने
२८ ऑक्टोबर, ऑस्ट्रेलिया विरुद्ध
१ नोव्हेंबर दक्षिण आफ्रिका विरुद्ध
४ नोव्हेंबर पाकिस्तान विरुद्ध
९ नोव्हेंबर श्रीलंका विरुद्ध
हे ही वाचा<< “पाकिस्तान विश्वचषक न जिंकण्याचे एकही कारण नाही, जर आम्ही..”, प्रशिक्षकांचं PAK vs SA आधी मोठं विधान
हे एकूणच गणित जुळून येणे अजिबात सोपे नाही पण पाकिस्तानचा आजवरचा आयसीसी मालिकांमधील इतिहास पाहता अगदी आयत्या वेळी त्यांनी बाजी मारून अंतिम फेरी सुद्धा गाठली आहे त्यामुळे क्रिकेटच्या विश्वचषकात आता पुढे काय होणार हे येत्या मॅचमध्येच स्पष्ट होईल.