ICC World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३मध्ये पाकिस्तानच्या खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख झका अश्रफ यांनी माजी कसोटीपटूंचा सल्ला घेणे सुरू केले आहे. मंगळवारी अश्रफ यांनी पाकिस्तान संघाचे निवड समिती प्रमुख इंझमाम-उल-हक, माजी खेळाडू मुहम्मद युसूफ आणि आकिब जावेद यांची लाहोरमध्ये भेट घेतली. पुढे कसे जायचे याचा सल्ला घेण्यासाठी वसीम अक्रम, वकार युनूस, सकलेन मुश्ताक आणि उमर गुल यांसारख्या दिग्गजांना भेटण्याची त्यांची योजना आहे.
पीसीबीच्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “पीसीबी प्रमुख पाकिस्तान संघातील सध्याच्या सदस्यांच्या विकासाबाबत त्यांचे विचार जाणून घेण्यासाठी इतर माजी खेळाडूंनाही भेटण्यास उत्सुक आहेत. अश्रफ यांनी विविध काळामध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केलेल्या माजी खेळाडूंचे कौशल्य समाविष्ट करण्यावर बोर्डाचे लक्ष केंद्रित करण्यावर भर दिला.
“या खेळाडूंनी सर्वोच्च स्तरावर पाकिस्तानची सेवा केली आहे आणि त्यांच्याकडे अनुभवाचा मोठा खजिना आहे. आमचे खेळाडू खेळाच्या सर्व पैलूंमध्ये चांगले विकसित झाले आहेत याची खात्री करण्यासाठी आम्ही त्यांचे कौशल्य वापरण्याची आशा करतो. आम्हाला आशा आहे की, आम्ही खेळाच्या सर्व विभागांमध्ये असे खेळाडू तयार करू शकू जे भविष्यात पाकिस्तानची सेवा करू शकतील,” असे अश्रफ म्हणाले.
जेव्हा जेव्हा राष्ट्रीय संघ आयसीसी विश्वचषक सारख्या स्पर्धेत चांगली कामगिरी करत नाही तेव्हा संतप्त क्रिकेट चाहत्यांना शांत करण्यासाठी पीसीबीने अधिक नुकसान होऊ नये यासाठी पावले उचलणे सामान्य आहे. भूतकाळातही, बोर्डाच्या माजी प्रमुखांनी पाकिस्तान क्रिकेट सुधारण्यासाठी पावले उचलत असल्याचे दाखवण्यासाठी अशाच प्रकारच्या चर्चा केल्या आहेत. अश्रफ यांनी पुढे असेही सांगितले की, “राष्ट्रीय क्रिकेट अकादमी देशांतर्गत क्रिकेटमधील अव्वल प्रतिभेसह एक विशेष शिबिर आयोजित करण्याची योजना आखत आहे.”
पीसीबी प्रमुख पुढे म्हणाले की, “या शिबिराचे प्राथमिक उद्दिष्ट या खेळाडूंना उत्तम सोयीसुविधा पुरवणे आणि त्यांचे मार्गदर्शन करणे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अंतर कमी करण्याच्या प्रयत्नात त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी तयार करणे हे आहे.” अनेक क्रिकेट विश्लेषक आणि काही माजी खेळाडूंचे असेही मत आहे की, अशा प्रकारच्या दिखाऊपणाचा पाकिस्तान क्रिकेटला फायदा होणार नाही कारण, सर्व प्रथम सध्याची क्रिकेट व्यवस्थापन समिती ४ नोव्हेंबरनंतर ४ महिन्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर कायम राहील की नाही हेच स्पष्ट नाही. त्यामुळे मुदत संपल्यानंतर त्यांनी घेतलेल्या या निर्णयांची अंमलबजावणी होणे फार कठीण आहे.