ICC ODI World Cup 2023, Rohit Sharma: भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान प्रेक्षकांच्या भरघोस पाठिंब्याच्या जोरावर भारतीय कर्णधार रोहित शर्माला विश्वास आहे की भारतीय संघ विजेतेपद पटकावेल. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २०११च्या विश्वचषकात जेतेपद पटकावले होते. रोहित म्हणाला, “मी कधीच इतक्या जवळून विश्वचषकाची ट्रॉफी पाहिली नाही. २०११ मध्ये आम्ही जिंकलो पण मी त्या संघात मी नव्हतो. ही एक सुंदर ट्रॉफी आहे आणि त्यामागे अनेक आठवणी, भूतकाळ, इतिहास आहे. हा क्षण माझ्यासाठी खूप भावूक आहे आणि आशा आहे की आम्ही ती विश्वचषकाची ट्रॉफी जिंकू,” असे रोहितने आयसीसीच्या एका कार्यक्रमात सांगितले. ५ ऑक्टोबरपासून ही स्पर्धा भारतातील दहा शहरांमध्ये खेळवली जाईल.
रोहितने वर्ल्ड कपच्या आठवणींना उजाळा दिला
आपल्या विश्वचषकाच्या आठवणींबद्दल बोलताना रोहित म्हणाला, “२००३च्या अंतिम फेरीपर्यंत भारत चांगला खेळला. सचिन तेंडुलकरने इतक्या धावा केल्या. त्यानंतर २००७ च्या विश्वचषकात आम्ही पहिल्याच फेरीत बाहेर पडलो,” या आणि अशा अनेक गोष्टीवर तो बोलला. रोहित शर्मा पुढे म्हणाला, “२०११ हा आपल्या सर्वांसाठी संस्मरणीय विश्वचषक होता. मी मायदेशात झालेल्या प्रत्येक सामना, प्रत्येक चेंडू पाहिला. त्यावेळी माझ्या एका बाजूला आनंद आणि दुख: असे दोन्ही भाव होते. एक तर संघात नसल्याचं दु:ख आणि मी एकही सामना बघायचं नाही असं ठरवलं होतं. दुसरा भारताने २८ वर्षांनी विश्वचषक जिंकला त्याचा आनंद होता.”
२०१९च्या विश्वचषकात रोहितने पाच शतके झळकावली होती. यावर तो म्हणाला, “मी २०१५ आणि २०१९ विश्वचषक खेळलो. तो एक अद्भुत अनुभव होता. आम्ही उपांत्य फेरीत पोहोचलो पण फायनल खेळू शकलो नाही. आता पुन्हा विश्वचषक भारतात आहे आणि आम्ही संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करत राहू. विश्वचषकातील प्रत्येक दिवस नवीन असतो आणि नवीन सुरुवात करावी लागते. हे कसोटी क्रिकेट नाही जिथे एक दिवस तुमचा वरचष्मा असतो आणि दुसऱ्या दिवशी देखील चालू राहील. १२ वर्षांनी पुन्हा ट्रॉफीच्या जवळ आलो आहोत. यावेळी मायदेशात विश्वचषक होत असल्याने आम्ही तो नक्कीच जिंकू असा मला विश्वास आहे.”
वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या पराभवावर रोहितचे मोठे विधान
भारतीय क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माने २०२२च्या टी२० विश्वचषकानंतर एकही टी२० सामना खेळलेला नाही. त्याच वेळी, भारतीय संघाला वेस्ट इंडिज विरुद्ध टी२० मध्ये सलग पराभव झाल्यानंतर चाहत्यांना आता रोहित, विराट कोहली, रवींद्र जडेजा सारख्या खेळाडूंची उणीव भासत आहे. आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन टी२० मालिकेतील पराभवानंतर रोहित शर्माने मौन सोडले आहे.
रोहित एका कार्यक्रमात म्हणाला, “या क्षणी मला वाटते की हे आमच्यासाठी ५० षटकांचे विश्वचषक वर्ष आहे हे आधीच स्पष्ट झाले आहे. त्यासाठी काही खेळाडूंना सर्व फॉरमॅट खेळणे शक्य नाही. जर तुम्ही वेळापत्रक बघितले तर एकापाठोपाठ सामने होते, म्हणून आम्ही काही खेळाडूंवर कामाचा ताण बघून निर्णय घेतला, आम्हाला खात्री करून घ्यायची होती की त्यांना पुरेसा विश्रांतीचा वेळ मिळेल आणि मी नक्कीच त्यात येतो.” नुकतेच टीम इंडियाचा कर्णधार आणि अनुभवी सलामीवीर रोहित शर्मानेही हातात विश्वचषकाची ट्रॉफी घेत सर्व संघांना एक इशारा दिला.