World Cup 2023 Semi Final IND vs NZ : विश्वचषक स्पर्धा २०२३ च्या उपांत्य फेरीतल्या पहिल्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे दोन मातब्बर संघ भिडले. मुंबईतल्या वानखेडे मैदानावर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचं आव्हान मोडून काढत ७० धावांनी विजय मिळवला आणि दिमाखात अंतिम फेरी गाठली. धावांचा महापूर ठरलेल्या लढतीत वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सात बळी घेत भारताला विजय मिळवून दिला. तत्पूर्वी भारताची रनमशीन असलेल्या विराट कोहलीचं विक्रमी ५०वं शतक, श्रेयस अय्यरचं विश्वचषक स्पर्धेतलं सलग दुसरं शतक यांच्या बळावर भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर ३९७ धावांचा डोंगर उभारला होता.
भारताने दिलेलं ३९८ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडनेही मोठी झुंज दिली. डॅरेल मिचेलच्या शतकाच्या बळावर न्यूझीलंडने दमदार प्रत्युत्तर दिलं पण दुसऱ्या बाजूने सातत्याने विकेट्स पडत गेल्याने न्यूझीलंडचा प्रतिकार अपुरा ठरला. उपांत्य फेरीतली दुसरी लढत उद्या (१६ नोव्हेंबर) कोलकाता इथे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवली जाणार आहे. या सामन्यातील विजेत्याशी भारताचा रविवारी मुकाबला होणार आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात किवी संघाने ५० धावांच्या आत दोन विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर कर्णधार केन विलियमसन आणि डॅरेल मिचेलने १७१ धावांची भागिदारी रचत भारताच्या चिंता वाढवल्या होत्या. परंतु, मोहम्मद शमीने केन विलियमसनला बाद करून ही जोडी फोडली आणि भारताच्या आशा जिवंत केल्या. शमीने या सामन्यात तब्बल सात बळी घेत न्यूझीलंडच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. या अटीतटीच्या सामन्यावर जगभरातून प्रतिक्रिया येत आहे. ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनीदेखील या सामन्यावर प्रतिक्रिया दिली आहे. परंतु, बिग बी यांची प्रतिक्रिया पाहून लोकांनी त्यांना विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना न पाहण्याचा सल्ला दिला आहे.
हे ही वाचा >> VIDEO : शतकवीर विराट कोहलीची ड्रेसिंग रूममधून पत्नी अनुष्काला पाहण्यासाठी धडपड; चाहते म्हणाले, “सो क्युट”
अमिताभ बच्चन यांचं क्रिकेटप्रेम सर्वश्रूत आहे. ते क्रिकेट सामने पाहण्यासाठी सतत धडपड करत असतात, असं त्यांनी त्यांच्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. चित्रपटाचं चित्रीकरण असो अथवा इतर कुठलं महत्त्वाचं काम, अमिताभ बच्चन वेळात वेळ काढून क्रिकेट सामने पाहतात. परंतु, आजचा सामना त्यांनी पाहिला नाही. अमिताभ बच्चन यांनी स्वतः एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर अशी पोस्ट शेअर केली आहे. बच्चन यांनी म्हटलं आहे की, मी जेव्हा क्रिकेट सामना पाहत नाही, तेव्हा भारतीय संघ तो सामना जिंकतो. भारताच्या विजयावरील बच्चन यांची ही प्रतिक्रिया पाहून त्यांना भारतीय क्रिकेट चाहत्यांनी विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना न पाहण्याची विनंती केली आहे.