ICC World Cup 2023Ticket Rates: आयसीसी विश्वचषक २०२३चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यावेळी ह्या स्पर्धेचे यजमानपद भारताकडे असणार आहे. ५ ऑक्टोबरपासून या विश्वचषकाला सुरूवात होणार आहे. त्याच वेळी, वर्ल्ड कपचा पहिला आणि अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. या स्पर्धेत १० ठिकाणी ४८ सामने खेळवले जाणार आहेत. पण या सगळ्यामध्ये विश्वचषकाच्या काही सामन्यांची तिकिटे जाहीर करण्यात आली आहेत.
अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी थेट स्टेडियममध्ये विश्वचषक सामने पाहण्याची ही उत्तम संधी आहे. कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर होणाऱ्या सामन्यांची तिकिटांच्या दरांची यादीही आली आहे. त्यामुळे जर तुम्ही स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला सर्व उपयुक्त माहिती येथे मिळेल.
काय आहे तिकिटांचे दर कोलकाताचे?
बंगाल क्रिकेट असोसिएशनने सांगितले की, “इडन गार्डन्सवर होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक २०२३च्या उपांत्य सामन्यासाठी प्रेक्षकांना किमान ९०० रुपये खर्च करावे लागतील. याशिवाय भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना आणि उपांत्य फेरीच्या तिकिटांची किंमत ९०० रुपये (अपर टायर) ते ३,००० रुपये (बी, एल ब्लॉक) दरम्यान असेल. या दोन सामन्यांच्या व्यतिरिक्त इतर तिकिटांची किंमत १५०० रुपये (डी, एच ब्लॉक) आणि २५०० रुपये (सी, के ब्लॉक) असेल. इडन गार्डन्सने पाच विश्वचषक सामने आयोजित केले आहेत आणि ६३,५०० प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे.”
६५० रुपयांपासून आहेत तिकिटांचे दर
बांगलादेश आणि पहिला क्वालिफायर यांच्यातील सामन्यासाठी सर्वात कमी तिकीट ६५० रुपये (अपर टायर) असेल. याशिवाय इतर तिकिटे १०० रुपये (डी आणि एच ब्लॉक) आणि १५०० रुपये (बी, सी, के, एल ब्लॉक) असतील. इंग्लंड आणि बांगलादेश विरुद्ध पाकिस्तानच्या दोन सामन्यांच्या तिकिटांची किंमत रु. ८०० (अपर टियर), रु १,२०० (डी, एच ब्लॉक), रु २,००० (सी, के ब्लॉक) आणि रु २,००० (बी, एल ब्लॉक) असेल.
तिकीट कधी, कुठे आणि कसे मिळवायचे?
विश्वचषक २०२३चे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर, चाहते सतत तिकीट कसे काढायचे? हे शोधत असतात. जेणेकरून पुढे तिकीट बुक करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही यासाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, विश्वचषक २०२३च्या तिकिटांची विक्री १ जुलैपासून सुरू होणार आहे. त्याचबरोबर आयसीसी लवकरच याबाबतची माहिती क्रिकेट चाहत्यांना देणार आहे. ICC त्यांच्या अधिकृत वेबसाइट cricketworldcup.com वर ऑनलाइन तिकिटे मिळतील.
आयसीसी विश्वचषक २०२३ च्या तिकिटांची विक्री आयसीसीच्या अधिकृत वेबसाइट आणि अॅपवर उपलब्ध असेल. यासाठी आयसीसीने Paytm, Paytm Insider, Book My Show बरोबर भागीदारी केली आहे, जिथे तुम्ही आयसीसी क्रिकेट विश्वचषक सामन्यांची तिकिटे खरेदी करू शकता. आयसीसी बहुतांश तिकिटांची ऑनलाइन विक्री करणार आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या तिकिटाची किंमत
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांची किंमत प्रति तिकिट १००० ते १०,००० रुपये असेल. स्थळ आणि सामन्यावर किंमती अवलंबून असतील. भारत-पाकिस्तान सामन्यांच्या तिकिटांच्या किमती जास्त आहेत कारण चाहते जवळून सामने पाहण्यास प्राधान्य देतात. याशिवाय, या ब्लॉकबस्टर सामन्याचे साक्षीदार होण्यासाठी अनेक उच्चहायप्रोफाइल सेलिब्रिटी देखील या सामन्यात उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.