World Cup 2023 Ticket Booking Website: एकदिवसीय विश्वचषक २०२३ ही या वर्षातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा असणार आहे आणि भारताला या मोठ्या स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची उत्तम संधी मिळाली आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या तिकीटांची शुक्रवारी विक्री सुरू झाली, परंतु अधिकृत वेबसाइट ३५ ते ४० मिनिटे बंद पडल्याने क्रीडा चाहत्यांना तिकीट बुक करण्यात अडचणी आल्या. चाहत्यांनी एकच गर्दी केल्याने अधिकृत वेबसाईट आणि अॅप क्रॅश झाले.
तिकिटांची विक्री खूप उशिरा सुरू झाली आहे आणि पहिल्याच दिवशी भारत ज्या सामन्यांमध्ये खेळत नाही अशा सामन्यांची विक्री होती. मात्र, ही प्रक्रिया स्थानिक वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू झाली आणि चाहत्यांनी ‘बुक माय शो’ अॅप क्रॅश झाल्याची लगेचच तक्रार केली. त्यानंतर तब्बल ३५ ते ४० मिनिटांनी पुन्हा ही वेबसाईट सुरु झाली. ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकासाठी हे अॅप तिकीट विक्रीचे भागीदार आहे. बीसीसीआयने २३ ऑगस्ट रोजी याची घोषणा केली होती.
दिल्लीतील क्रीडाप्रेमी अतिरव कपूर यांनी शुक्रवारी सांगितले की, “हे खरोखर निराशाजनक आहे. तिकीट विक्रीची घोषणा एवढ्या उशिराने होणे आणि त्यानंतर मूलभूत यंत्रणा तयार नसणे, यामुळे बलाढ्य बीसीसीआय आणि आयसीसीची प्रतिमा मलिन होत आहे. अशा स्पर्धा जगभरात आयोजित केल्या जातात, ज्यासाठी लॉटरी आणि तिकीट लाइन यासारख्या प्रणाली खूप सामान्य आहेत. एक स्पर्धा आयोजित करताना एवढ्या अडचणी येणे ही लाजिरवाणी बाब आहे.”
तिकिटांची विक्री सुरू झाल्यानंतर क्रॅश झालेली वेबसाईट ३५ ते ४० मिनिटांनी पुन्हा सुरु झाली पण, तोपर्यंत अनेक चाहत्यांचा संयम सुटला होता. काही चाहत्यांनी तक्रार केली की साइट क्रॅश झाली, तर काहींनी सांगितले की खरेदी करताना त्यांचे डिव्हाइस हँग झाले. केवळ भारताच्या सामन्यांचीच नव्हे तर इतर सामन्यांची तिकिटे खरेदी करणे हेही चाहत्यांसाठी कठीण काम असल्याचे दिसून आले.
भारतातील १० शहरांमध्ये सामने होणार आहेत
विश्वचषकात एकूण ५८ सामने खेळले जाणार आहेत. यामध्ये १० सराव सामन्यांचा समावेश आहे. विश्वचषकाचे सामने भारतातील १० शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. हैदराबाद, अहमदाबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरू, मुंबई आणि कोलकाता येथे सामने होणार आहेत. गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम व्यतिरिक्त हैदराबाद येथे सराव सामने होणार आहेत. या सामन्यांची तिकिटे तिकीट विक्री वेबसाइटवर खरेदी करता येतील, अशी माहिती बीसीसीआयने दिली. स्पर्धेतील मुख्य सामन्यांची तसेच सराव सामन्यांची तिकिटेही या वेबसाइटवर उपलब्ध असतील. बीसीसीआयने आपल्या ट्वीटमध्ये या वेबसाइटचा उल्लेख केला होता.
अहमदाबादमध्ये पहिला आणि शेवटचा सामना
सलामीचा सामना अहमदाबादमध्ये ५ ऑक्टोबरला तर अंतिम सामना १९ नोव्हेंबरला होणार आहे. या विश्वचषकात एकूण १० संघ सहभागी होणार आहेत. श्रीलंका आणि नेदरलँडचे संघ पात्रता फेरीतून या स्पर्धेत पोहोचले आहेत.