AB de Villiers on Virat Kohli: अलीकडेच आशिया कपमध्ये विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध शानदार शतक झळकावले होते. मात्र, विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन वन डे मालिकेत खेळला नाही. आता भारतीय संघ आणि विराट कोहलीच्या नजरा २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकावर आहेत. दरम्यान, आयपीएलमध्ये विराट कोहलीबरोबर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळलेला दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने मोठी भविष्यवाणी केली आहे. खरंतर, एबी डिव्हिलियर्सला अशी खात्री वाटत आहे की विराट कोहली ‘विश्वचषक २०२३’ नंतर ‘वन डे’ आणि ‘टी२०’ फॉरमॅटला अलविदा करेल.
विराट कोहलीच्या निवृत्तीवर एबी डिव्हिलियर्स काय म्हणाला?
एबी डिव्हिलियर्सने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, “यानंतर आगामी एकदिवसीय विश्वचषक २०२७ साली दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर खेळवला जाणार आहे. विराट कोहली पुढच्या विश्वचषकापर्यंत खेळणार की नाही हे आत्ताच सांगणे अवघड आहे. २०२७च्या विश्वचषक स्पर्धेसाठी बराच वेळ शिल्लक असल्याने तो याबाबत काय निर्णय घेतो हे सांगणे कठीण आहे.” तो पुढे म्हणाला की, “जर विराट कोहलीला विचाराल तर तो म्हणेल की, मी सध्या वर्ल्ड कप २०२३वर लक्ष्य केंद्रित करत आहे. टीम इंडियाने जर हा विश्वचषक जिंकला तर विराट कोहलीसाठी यापेक्षा चांगले गिफ्ट काय असेल… विराट कोहलीसाठी ही एक संघाने दिलेले मोठी भेट असेल,” असेही तो म्हणाला.
‘विराट कोहली एकदिवसीय आणि टी२० फॉरमॅटला अलविदा म्हणू शकतो’
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स म्हणाला की, “या विश्वचषकानंतर विराट कोहली वन डे आणि टी२० फॉरमॅटला अलविदा म्हणू शकतो. मात्र, विराट कोहली पुढील काही वर्षे कसोटी आणि आयपीएल खेळेल असे मला वाटते.” एबी डिव्हिलियर्सच्या या अंदाजानंतर विराट कोहलीचे करोडो चाहते दु:खी झाले आहेत, मात्र २०२३च्या विश्वचषकानंतर विराट कोहली वन डे आणि टी२० फॉरमॅटला खरोखरच अलविदा करणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सध्या विराट कोहलीचे वय अंदाजे ३४ वर्षे आहे. याशिवाय तो शारीरिकदृष्ट्या खूप तंदुरुस्त आहे. विराट कोहलीच्या चाहत्यांना आशा आहे की, आगामी एकदिवसीय विश्वचषकापर्यंत किंग कोहली नक्कीच खेळेल.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विराट कोहलीची आकडेवारी
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची बॅट सध्या खूप धावा करत आहे. फॉरमॅट कोणताही असो, त्याच्या बॅटमधून सतत धावा निघत असतात. आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास, विराटने आतापर्यंत १११ कसोटी, २८० एकदिवसीय आणि ११५ टी२० सामन्यांमध्ये अनुक्रमे ८६७६, १३०२७ आणि ४००८ धावा केल्या आहेत. या काळात त्याने ७७ आंतरराष्ट्रीय शतकेही झळकावली आहेत. सचिन तेंडुलकरचा कारकिर्दीतील १०० शतकांचा विक्रम तो नक्कीच मोडेल, अशी आशा आहे.