बाकू (अझरबैजान) : भारताचे ग्रँडमास्टर डी. गुकेश आणि विदित गुजराथीचे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. त्याचवेळी प्रज्ञानंद आणि अर्जुन यांच्यातील लढत दोन डावानंतर बरोबरीत राहिल्यामुळे आता ‘टायब्रेकर’मध्ये या लढतीचा निर्णय लागेल.
गुकेशला माजी जगज्जेता अग्रमानांकित मॅग्नस कार्लसन, तर विदितला अझरबैजानच्या निजात अबासोवविरुद्ध पराभव पत्करावा लागला. प्रज्ञानंद पहिल्या डावात अर्जुनकडून पराभूत झाला होता. मात्र, बुधवारी दुसऱ्या डावात प्रज्ञानंदने मुसंडी मारताना ७५ चालीत अर्जुनवर मात करून पारंपारिक पद्धतीमधील डाव १-१ असे बरोबरीत सोडवली. आता जलदगती पद्धतीमधील ‘टायब्रेकर’मध्ये या लढतीचा विजेता ठरेल.
गुकेश कार्लसनविरुद्ध पहिला डाव हरला होता. त्यामुळे दुसऱ्या डावात कार्लसनला बरोबरीही पुरेशी होती. काळय़ा मोहऱ्यासह दुसऱ्या डावात खेळताना गुकेशने प्रयत्नांची शिकस्त केली. पण, तो विजयापासून वंचित राहिला. कार्लसनने ५९ चालीत बरोबरी पत्करून १.५-०.५ असा विजय मिळवला.
विदितने अबासोवविरुद्ध पहिला डाव बरोबरीत सोडवला होता. पण, दुसऱ्या डावात अबासोवचा प्रतिकार करण्यात विदितला अपयश आले. अबासोवने दुसरा डाव ४४ चालीतच जिंकताना विदितचा १.५-०.५ असा पराभव केला. या स्पर्धेतील पहिले तीन खेळाडू २०२४च्या ‘कँन्डिडेट्स’ स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत.