राजधानी दिल्लीत अरुण जेटली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर श्रीलंकेविरुद्धच्या वर्ल्डकप लढतीत एडन मारक्रमने चौकार, षटकारांची लयलूट करत अवघ्या ४९ चेंडूत वादळी शतकाची नोंद केली. वर्ल्डकप इतिहासातलं हे सगळ्यात वेगवान शतक आहे. मारक्रमने आयर्लंडच्या केव्हिन ओब्रायनचा ५० चेंडूत शतकाचा विक्रम मोडला. मारक्रमने सहकारी क्विंटन डी कॉक आणि रासी व्हँन डर डुसेचा कित्ता गिरवत तिसरा शतकवीर होण्याचा मानही पटकावला. मारक्रमची खेळी डोळ्यांचं पारणं फेडणारी होती. मात्र याच भारत भूमीवर चार वर्षांपूर्वी मारक्रमने रागाच्या भरात स्वत:ला दुखापतग्रस्त करुन घेतलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात होता. मारक्रम आफ्रिका संघाचा महत्त्वाचा खेळाडू होता. सराव सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या मारक्रमला पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. पुणे इथल्या कसोटीदरम्यान दुसऱ्या डावात बाद झाल्यानंतर मारक्रमने रागाच्या भरात हात आपटला. मारक्रमच्या मनगटाला गंभीर दुखापत झाली.

विशाखापट्टणम आणि पुणे कसोटी आफ्रिकेने गमावली होती. मारक्रमची दुखापत गंभीर असल्याने त्याला मायदेशी पाठवण्यात आलं. उर्वरित तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत तो खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. सराव सामन्यात मारक्रमने शतक झळकावलं होतं. विशाखापट्टणम कसोटीत त्याला ५ आणि ३९ धावाच करता आल्या. पुणे कसोटीत तर मारक्रमला दोन्ही डावात भोपळाही फोडता आला नव्हता. यामुळेच तो नाराज झाला. रागाच्या भरात त्याचा हात जोरात आपटला.

क्रिकेट साऊथ आफ्रिकेने त्यावेळी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार मारक्रमच्या मनगटाचं सिटी स्कॅन करण्यात आलं. त्याच्या मनगटाच्या हाडाला फ्रॅक्चर झालं आहे. उर्वरित दोन कसोटीत तो खेळू शकणार नाही. मायदेशी पोहोचताच तो पुढच्या उपचारांसाठी विशेषज्ञांची भेट घेईल. मारक्रमच्या ऐवजी बदली खेळाडूची घोषणा करण्यात आलेली नाही.

नाराज मारक्रमने यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं होतं. “अशा पद्धतीने घरी परतावं लागणं नामुष्कीचं आहे. मी गंभीर अशी चूक केली आहे. मी याची पूर्ण जबाबदारी स्वीकारतो. पुन्हा माझ्या हातून असं वर्तन होणार नाही. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संस्कृतीत असं वर्तन अपेक्षित नाही. मी संघाच्या विश्वासाला पात्र ठरु शकलो नाही याचं दु:ख आहे. मी यातून शिकलो आहे. खेळताना भावना अनावर होतात. पण असं वर्तन योग्य नाही. मी संघ सहकाऱ्यांची माफी मागितली आहे. दक्षिण आफ्रिकेचे चाहते मला समजून घेतील अशी आशा आहे”.

या घटनेतून बोध घेत मारक्रमने दक्षिण आफ्रिकेसाठी दमदार पुनरागमन केलं. त्याला संघातून वगळण्यातही आलं होतं. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये धावांच्या राशी ओतत मारक्रम परतला. टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी२० अशा तिन्ही प्रकारात सातत्याने धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये मारक्रमची गणना होते. मारक्रमने दक्षिण आफ्रिकेच्या नेतृत्वाची धुराही सांभाळली आहे. सलामीवीर तसंच मधल्या फळीतला महत्त्वपूर्ण फलंदाज अशी मारक्रमची ओळख आहे. आयपीएल स्पर्धेत मारक्रम सनरायझर्स हैदराबाद संघाचं नेतृत्व करतो. ३५ टेस्ट, ५५ वनडे आणि ३७ ट्वेन्टी२० सामन्यात मारक्रमने दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World cup fastest centurion aiden markram got himself injured after hitting his hand apologised to the team psp