मुंबई : विश्वचषक फुटबॉल कतार २०२२मध्ये शुक्रवारपासून उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्यांना सुरुवात होत आहे. साखळी टप्पा आणि दुसऱ्या फेरीतील काही धक्कादायक निकालानंतर फुटबॉलमधील नेहमीच्या महासत्तांमध्येच चुरस दिसून येते. मात्र मोरोक्कोसारखा नवोदित संघ आणखी किती धक्के देतो, हे पाहणेही रंजक ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्राझील-क्रोएशिया, अर्जेटिना-नेदरलँड्स, पोर्तुगाल-मोरोक्को आणि इंग्लंड-फ्रान्स अशा उपान्त्यपूर्व फेरीच्या लढती होत आहेत. ब्राझील, अर्जेटिना, फ्रान्स आणि इंग्लंड या माजी विजेत्यांकडून मोठय़ा अपेक्षा आहेत अर्जेटिना वगळता बाकीच्या संघांचा खेळ बऱ्यापैकी लौकीकास साजेसा झाला. अर्जेटिनाने लिओनेल मेसीच्या नेतृत्वाखाली थोडी उशिरा मुसंडी मारली. नेदरलँड्सचा संघ यंदा भरात आहे. तर क्रोएशियाच्या संघात अनेक अनुभवी खेळाडूंचा भरणा असल्यामुळे या संघास कमी लेखता येत नाही. परंतु या मांदियाळीत नवोदित मोरोक्को संघ लक्षवेधी ठरतो, कारण या टप्प्यापर्यंत पोहोचलेला तो पहिला अरब आणि चौथा आफ्रिकी संघ ठरला. याशिवाय धक्कादायक निकालांच्या या स्पर्धेतले शिल्लक प्रकरण म्हणूनही या संघाकडे पाहता येईल. रोनाल्डोशिवाय पोर्तुगाल नुसताच नव्हे, तर दिमाखात जिंकू शकतो हे दिसून आले आहे. शिवाय ब्राझीलप्रमाणेच पोर्तुगालचा खेळही आधीच्या फेरीमध्ये प्रवाही आणि आकर्षक होता. परंतु या टप्प्यावर निव्वळ कौशल्यापेक्षा अनुभवही निर्णायक ठरत असतो. त्यामुळेच माजी विजेत्या संघांना अधिक संधी आहे, असे म्हणता येईल.

कोण जिंकू शकेल?

  • ब्राझील-क्रोएशिया (ब्राझील?)
  • अर्जेटिना-नेदरलँड्स (अर्जेटिना?)
  • मोरोक्को-पोर्तुगाल (पोर्तुगाल?)
  • फ्रान्स-इंग्लंड (फ्रान्स?)
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World cup football in qatar 2022 thrill quarter finals ysh