अमेरिका आणि पोर्तुगाल दरम्यानचा सामना चांगलाच रंगात आलेला.. अंकल सॅम पद्धतीचा शर्ट घातलेला अमेरिकन माणूस मला विचारतो, ‘‘सामना सुरू असताना संगीत ऐकायला इथे मनाई आहे का?’’ मी काही उत्तर देण्याआधी स्वातंत्र्यदेवतेच्या (स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या) वेशभूषेतली तरुणी उद्गारली, ‘‘हा सामना ‘याचि देही, याचि डोळा’ पाहण्यासाठी हजारो डॉलर्स खर्च करून मी मनाऊस स्टेडियममध्ये गेले नाही हे बरेच झाले. मनाऊसला नेण्यासाठी माझे मित्रमैत्रिणी मला पटवण्याचा कसोशीने प्रयत्न करत होते. पण फुटबॉल हा प्रेक्षकांनी कल्ला करून पाहण्याचा खेळ नाहीच!’’ तिच्या बोलण्यावर माझा विश्वास बसेना. मी स्वत:ला चिमटा काढून ऐकले ते खरे असल्याची खात्री केली. बरे ती तरुणी मेणाचा पुतळाही नव्हती. तिने स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्यासारखी वेशभूषा केली होती, पण तिचे विचार हाडामांसाच्या जिवंत माणसाचे होते. माझ्या उंचावलेल्या भुवया पाहून तिने स्वत:हूनच उद्गाराचे स्पष्टीकरण दिले. ‘‘इतक्या साऱ्या देशांमध्ये फुटबॉल खेळला जातो. इतकी सारी माणसे फुटबॉलसाठी वेडी होताना पाहणेच अविश्वसनीय आहे आणि ते त्यांच्यासाठी चांगले आहे. पण फुटबॉलला बास्केटबॉलची सर नाही. या दोन खेळांची तुलनाच होऊ शकत नाही.. आणि एवढय़ा जल्लोषी खेळात चीअरगर्ल्स कुठे आहेत? मी चीअरगर्ल होते. उत्सवाचा सूर टिपेला नेण्यासाठी चीअरलीडर्स असणे अगदीच आवश्यक आहे. गोल झाल्यावर चीअरलीडर्सचे नृत्य चाहत्यांना बेभान करेल!’’
तिचं बोलणं ऐकता ऐकता सामन्यातला थरार टिपेला जातो. आजूबाजूच्या कल्लोळात काही ऐकायला येणे शक्य होत नाही. मिस लिबर्टीचे शब्द माझ्या कानात गुंजत राहतात. खेळ थोडासा मंदावतो तेवढय़ात अंकल सॅम शर्टवाला माणूस पुन्हा एका प्रश्नाने मला डिवचतो, ‘‘सामन्यात उत्कंठा असताना संगीत वगैरे गोष्टींना मज्जाव आहे का? भव्य पडद्यावर आपण सामना पाहतोय, आपल्या आनंदात भर पडण्यासाठी संगीताची व्यवस्था का नाही? खुल्या संस्कृतीचा देश म्हणून ब्राझील ओळखला जातो ना? मग एवढी अरसिकता का?’’ त्यांच्या सवालांना माझ्याकडे उत्तर नाही. त्यांच्यापासून पळ काढत मी थोडा दूर जातो.
मिस लिबर्टीच्या कंपूला मी विचारतो, ‘‘तुम्ही ब्राझीलला का आलात?’’ तेव्हा त्यापैकी एकाने मला उत्तर दिले, ‘‘फुटबॉल एकत्र पाहण्याची गोष्ट आहे. इथल्या धमाल वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही इतक्या दूरवरून आलो आहोत. सामना झाल्यावर होणाऱ्या पाटर्य़ासाठी बहुतांशी जण तयार आहोत.’’ रोनाल्डोच्या क्रॉसवर सिल्व्हेस्टर वरेला गोल करतो आणि पोर्तुगालच्या चाहत्यांना उधाण येते. मी आजूबाजूला पाहतो अंकल सॅम शर्टातला माणूस
आणि मिस लिबर्टी दोघेही दिसत नाहीत. बहुधा बरोबरीचे दु:ख विसरण्यासाठी त्यांनी संगीताच्या
नाचावर थिरकण्याला प्राधान्य देत नाइट क्लब गाठलेला असावा.

Story img Loader