दोहा : आघाडीपटू एनर व्हेलेंसियाने झळकावलेल्या दोन गोलच्या बळावर विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत इक्वेडोरने रविवारी यजमान कतारवर २-० असा विजय इक्वेडोरने रविवारी यजमान कतारवर २-० असा विजय मिळवला. विश्वचषक स्पर्धेत यजमान संघ उद्घाटनीय सामन्यात पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ होती.
इक्वेडोरने सामन्याच्या सुरुवातीपासूनच नियंत्रण मिळवत कतारच्या बचाव फळीवर दडपण आणले. तिसऱ्या मिनिटाला व्हेलेंसियाने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र, पंचांनी ‘ऑफसाइड’चा इशारा केल्याने तो गोल अवैध ठरवण्यात आला. यानंतरही इक्वेडोरच्या खेळाडूंचे कतारवर आक्रमण सुरू होते. १६व्या मिनिटाला पेनल्टीच्या साहाय्याने व्हेलेंसियाने गोल झळकावत इक्वेडोरला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर व्हेलेंसियाने (३१व्या मि.) पुन्हा एकदा पुढाकार घेत हेडरच्या मदतीने अप्रतिम गोल करत इक्वेडोरला २-० अशा मजबूत स्थितीत पोहोचवले. इक्वेडोरने मध्यंतरापर्यंत ही आघाडी कायम ठेवली होती. दुसऱ्या सत्रात कतारकडून आघाडी कमी करण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, त्यांना यश मिळाले नाही.