World Cup 1983, India vs West Indies: १९८३ साल कोण विसरू शकेल, जेव्हा भारतीय क्रिकेट संघाने इतिहास रचला आणि प्रथमच विश्वचषक ट्रॉफी जिंकली. अंतिम फेरीत वेस्ट इंडिज संघाचा भाग असलेल्या या अनुभवी वेगवान गोलंदाजाने आता एका मुलाखतीत सांगितले की, “भारत नशिबाने अंतिम सामना जिंकला.”वेस्ट इंडिजचा महान वेगवान गोलंदाज अँडी रॉबर्ट्सने १९८३चा विश्वचषक भारताने जिंकला कारण, त्यावेळी त्यांचे लक त्यांच्या बाजूने होते”, भारत भाग्यवान असल्याचे मत व्यक्त केले. कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील कमकुवत भारताने लॉर्ड्सवरील अंतिम सामन्यात बलाढ्य वेस्ट इंडिजचा पराभव करून पहिले विश्वविजेतेपद पटकावत इतिहास रचला. वर्ल्डकपच्या गेल्या दोन आवृत्त्या जिंकणारा वेस्ट इंडिजचा संघही सलग तिसऱ्यांदा विजेतेपदाचा दावेदार होता, पण भारताने शानदार कामगिरी केली.
भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या बाजूनेही लोक नव्हते, पण कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील संघाने इतिहास रचला. भारताचा संघ वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वेसोबत एका गटात होता. भारताने तिन्ही संघांविरुद्ध प्रत्येकी दोनदा सामने खेळले. अव्वल दोन मानांकित संघ उपांत्य फेरीत जाणार अशी संरचना होती. भारताने पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव केला होता. विश्वचषक स्पर्धेत विंडीज संघाचा पराभव होण्याची ही पहिलीच वेळ होती.
मात्र, दुसऱ्या सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजकडून पराभव झाला. भारताने झिम्बाब्वेला दोनदा तर ऑस्ट्रेलियाला एकदा पराभूत केले होते. अशा प्रकारे भारताने उपांत्य फेरी गाठली, जिथे भारताने इंग्लंडचा पराभव केला आणि कमी धावसंख्येच्या अंतिम सामन्यात भारताने दोन वेळचा चॅम्पियन संघ वेस्ट इंडिज संघाला धूळ चारली. त्यांच्याकडे डेसमंड हेन्स, गॉर्डन ग्रीनिज, क्लाइव्ह लॉईड आणि व्हिव्ह रिचर्ड्स यांसारखे दिग्गज फलंदाज होते.
त्यावेळी भारत कमकुवत मानला जात होता
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे १९८३च्या विश्वचषकात भारत कमकुवत संघ म्हणून उतरला होता. विजेतेपदाच्या वाटेवर त्याने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि त्यानंतर दोन वेळा चॅम्पियन राहिलेल्या वेस्ट इंडिजसारख्या अव्वल संघांना पराभूत करून जगाला चकित केले. १९८३च्या विश्वचषकात भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामने खेळले गेले आणि भारताने अंतिम सामन्यासह दोन वेळा वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळवला. परंतु अँडी रॉबर्ट्स, जो त्या संघाचा भाग होता त्याला वेस्ट इंडिजच्या वेगवान आक्रमणाचा प्रमुख म्हटले जात होते. त्याने एवढ्या वर्षांनी सर्वांना अचंबित करणारे विधान केले. तो म्हणाला की, “वेस्ट इंडिजने स्पर्धा जिंकली असती असा मला अजूनही विश्वास वाटतो. मी स्पष्टपणे सांगतो माझ्याकडे जगातील सर्वोतम संघ होता. मात्र, जेतेपद पटकावण्यात भारतीय संघ भाग्यवान ठरला. त्यांना नशिबाने त्यादिवशी साथ दिली.”
वेस्ट इंडिजचा दिग्गज वेगवान गोलंदाज आणि संघाचे तत्कालीन सदस्य अँडी रॉबर्ट्स याने याबाबत वक्तव्य केले आहे. तो स्पोर्टस्टारशी बोलताना म्हणाला, “होय, आम्ही भारताकडून हरलो पण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे हे सर्वांना माहीत आहे. तुम्ही काही सामने जिंकता आणि काही हरता. आम्ही नेहमी जिंकण्यासाठी खेळतो, परंतु प्रामाणिकपणे आणि स्पष्टपणे सांगतो आम्हाला एका चांगल्या संघाकडून आम्ही पराभूत झालो नाही. क्रिकेट हा एक असा खेळ आहे ज्यामध्ये तुम्हाला सामन्यादरम्यान सजग रहावे लागते. क्रिकेटकडे लोक नशिबाचा आणि संधीचा खेळ म्हणून पाहत नाहीत. १९८३ पर्यंत आम्ही विश्वचषकात एकही सामना गमावला नव्हता आणि १९८३ मध्ये आम्ही भारताकडून दोनदा हरलो.”
टीम इंडिया नशिबाने जिंकली
तो पुढे म्हणाला, “आम्ही फॉर्ममध्ये होतो, पण खराब खेळामुळे त्या दिवशी आम्ही हरलो. हे १९८३ मध्ये भारताचे भाग्य होते. आमचा इतका मोठा संघ असूनही आम्ही १९८३ मध्ये दोन सामने हरलो आणि दोन्ही भारताविरुद्ध. त्यानंतर ५ किंवा ६ महिन्यांनी आम्ही भारताला ६-०ने हरवले. त्यामुळे, तो फक्त खेळ होता. १८०च्या जवळ आऊट झाल्यानंतर नशिबाने भारताला साथ दिली. तो भारताचा अतिआत्मविश्वास नव्हता.” १९८३च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत १८३ धावांवर सर्वबाद झाला होता, त्यानंतर गॉर्डन ग्रीनिज, डेसमंड हेन्स, व्हिव्हियन रिचर्ड्स आणि क्लाइव्ह लॉयड सारख्या दिग्गजांचा संघ वेस्ट इंडिज ४३ धावांनी पराभूत झाला होता. मदन लाल आणि मोहिंदर अमरनाथ यांनी ३-३ विकेट्स घेत प्रतिस्पर्धी फलंदाजांची फळी उद्ध्वस्त केली.