सध्याचा फुटबॉल हा खेळ अधिकाधिक आक्रमक होत चालला असून रेफरींना काम करताना अनेक अडचणी येत असतात. मैदानावरील एकमेव रेफरी किती आणि कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणार, हादेखील महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणूनच रेफरींवरील कामाचा बोजा हलका करण्यासाठी आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (फिफा) नानाविध प्रयोग करत असते. गोललाइन तंत्रज्ञान हा त्याचाच भाग. गेल्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान इंग्लंडच्या फ्रँक लॅम्पार्डने जर्मनीविरुद्ध गोल केला असतानाही रेफरींनी तो नाकारला. लॅम्पार्डने मारलेला फटका गोलबारला लागून गोलरेषेच्या आत पडला होता. पण पंचांना ते न समजल्यामुळे त्यांनी तो गोल नाकारला. या निर्णयामुळे इंग्लंडला बाहेरचा रस्ता धरावा लागला. म्हणूनच या वेळेला फिफाने गोललाइन तंत्रज्ञान अमलात आणले. चेंडूने गोलरेषा पार केली की नाही, याबाबतचा अचूक निर्णय काही सेकंदांत या तंत्रज्ञानाद्वारे मिळतो. त्यामुळे रेफरींवरील ताण हलका झाला आहे.
विश्वचषकाला सुरुवात झाल्यापासून रेफरींच्या शॉर्ट पँटच्या मागे एक स्प्रे अडकवला असल्याचे सर्वानाच पाहायला मिळत आहे. फुटबॉलमध्ये हा स्प्रे कशासाठी? असा प्रश्न सर्वानाच पडला असेल. फ्री-किक घेताना प्रतिस्पर्धी खेळाडूंची बचावभिंत उभी करणे म्हणजे रेफरींसाठी अग्निदिव्यच. फ्री-किक आणि या खेळाडूंमधील अंतर किमान १० यार्ड असावे लागते. पण काही खेळाडू ही भिंत मोडून चेंडूच्या दिशेने धावत सुटतात. त्यामुळे रेफरींना वारंवार फ्री-किक द्यावी लागते. या दरम्यान खेळाडू आणि रेफरींमध्ये बऱ्याच वेळा बाचाबाची घडते. फिफाच्या नियमानुसार बचावभिंतीतील कोणत्याही खेळाडूने ही साखळी मोडता कामा नये तसेच फ्री-किक घेणाऱ्या खेळाडूसाठी अडथळा आणू नये. पण बऱ्याच वेळेला तसे होताना दिसत नाही. त्यामुळे रेफरींपुढील समस्या आणखी वाढत जातात. यावर उपाय म्हणून अर्जेटिनाने २००८मध्ये आपल्या राष्ट्रीय संघाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांकरिता सर्वप्रथम व्ॉनिशिंग स्प्रेचा वापर सुरू केला. हळूहळू अमेरिका खंडातील जवळपास सर्वच देशांनी व्ॉनिशिंग स्प्रेचा अवलंब करण्यास सुरुवात केली. २०१३मधील फिफा २० वर्षांखालील विश्वचषक आणि फिफा क्लब विश्वचषकात या व्ॉनिशिंग स्प्रेचा यशस्वी वापर करण्यात आल्यानंतर आता हे तंत्रज्ञान फिफा विश्वचषकामध्येही वापरण्यात येत आहे.
फ्री-किक घेताना खेळाडूंची एका रांगेत बचावभिंत उभी केली की त्यांच्या बुटासमोर स्प्रेद्वारे एक रेष आखली जाते. खेळाडूंनी ही रेषा ओलांडली तर त्याला पिवळे कार्ड दाखवण्याचा अधिकार रेफरींना देण्यात आला आहे. पांढऱ्या रंगाचा हा द्रवरूप स्प्रे मारल्यानंतर एका मिनिटात नाहीसा होतो. त्यामुळे मैदानावरील गवताला कोणताही धोका पोहोचत नाही. या तंत्रज्ञानामुळे रेफरींना खिलाडीवृत्तीनुसार खेळ सुरू ठेवता येतो. म्हणूनच व्ॉनिशिंग स्प्रे हे रेफरींसाठी महत्त्वाचे उपकरण ठरू लागले आहे. खेळाडूंना रोखण्यासाठी हे रेफरींचे आयुध बनले आहे. म्हणूनच हा व्ॉनिशिंग स्पे नव्हे तर ‘मॅजिक स्प्रे’ ठरू लागला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा