ICC World Cup 2023: विश्वचषक २०२३च्या २९व्या सामन्यात भारताने इंग्लंडचा १०० धावांनी पराभव केला. भारताने लखनऊ येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर या स्पर्धेतील सहावा सामनाही जिंकला आहे. दुसरीकडे, इंग्लंड संघाला आतापर्यंत सहा पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. इंग्लंडची सध्याची कामगिरी पाहता टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शास्त्री यांनी इंग्लंड संघाला फटकारले
या पराभवाची जबाबदारी इंग्लंडने घेतली पाहिजे, असे मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. इंग्लंड संघाला फटकारताना ते म्हणाले, “इंग्लंड १७ षटके बाकी असताना न्यूझीलंडकडून पहिला सामना हरला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धही तो २० षटकांत सर्वबाद झाला होता. श्रीलंकेविरुद्ध संपूर्ण संघ ३० षटकांपर्यंतच फलंदाजी करू शकलो. या सामन्यात श्रीलंकेने पाठलाग करत २५ षटकांत विजय मिळवला. इंग्लंड संघाने भारताविरुद्ध अवघ्या ३२ षटकांत आठ विकेट्स गमावल्या. या अशा कामगिरीच्या भरवशावर तुम्ही स्वतःला गतविजेते म्हणवता का? इंग्लंडबरोबरचे प्रेक्षक आणि त्यांच्या समर्थकांनाही या कामगिरीमुळे खूप धक्का बसला असेल.”
शास्त्री पुढे म्हणाले, “ जर तुम्हाला थोडी तरी इज्जत वाचवायची असेल तर इथून पुढचे सर्व सामने इंग्लंडला आपल्या सन्मानासाठी खेळावे लागतील आणि त्यात विजय मिळवावा लागेल. कारण, गुणतालिकेत इंग्लंड शेवटच्या स्थानावर आहे आणि अव्वल आठ संघ २०२५ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरतील. जर इंग्लंडचा संघ असाच शेवटच्या स्थानी राहिला, तर आयसीसीच्या या थेट स्पर्धेतून बाहेर पडेल.”
समालोचक शास्त्री पुढे म्हणाले, “इथून पुढे इंग्लंडला आपल्या मनोबल उंचावण्यासाठी खेळावे लागेल. मी हे म्हणत आहे कारण, सध्या ते गुणतालिकेत तळाशी आहेत. जर इंग्लंडचे तळाच्या दोनमध्ये स्थान कायम राहिले, तर कल्पना करा की त्यांच्यासारखा संघ आयसीसी स्पर्धा खेळू शकणार नाही आणि हा क्रिकेट खेळासाठी खूप मोठा धक्का असेल.”
लखनऊच्या एकाना स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना इंग्लंडच्या संघाने भारताला २२९ धावांवर रोखले. मात्र, विजयाचे हे लक्ष्य गाठण्यासाठी इंग्लंडचा निम्मा संघ अवघ्या ५२ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. लियाम लिव्हिंगस्टोन व्यतिरिक्त इतर कोणत्याही खेळाडूला २०चा आकडाही पार करता आला नाही. वर्ल्डकपमध्ये इंग्लंडच्या सलग पराभवानंतर, माजी कर्णधार इऑन मॉर्गनचे मत आहे की, “ड्रेसिंग रूममधील संघातील खेळाडूंच्या मनोबलावर या पराभवाचा वाईट परिणाम झाला आहे. इंग्लंडला यातून बाहेर पडण्यासाठी एका विजयाची गरज आहे.”