वानखेडे स्टेडियमवर दोन वर्षांपूर्वी झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीची विकल्या न गेलेल्या ४०५ तिकिटांबद्दलच्या घोटाळ्याचा आरोप करत मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) विश्वचषकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तत्कालीन खजिनदार रत्नाकर शेट्टी यांच्यासह पाच जणांना समन्स बजावले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एमसीएने समिती स्थापन केली असून या समितीपुढे या पाचही जणांना हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे.
‘‘मला एमसीएचा ‘ई-मेल’ आला आहे. त्यानुसार माझ्यासह चार जणांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. या चौकशी समितीपुढे जायचे की नाही, याबाबत अद्याप मी निर्णय घेतलेला नाही,’’ असे शेट्टी यांनी सांगितले.
शेट्टी यांच्यासह एमसीएने माजी संयुक्त सचिव लालचंद राजपूत, विद्यमान कार्यकारिणी सदस्य गणेश अय्यर, माजी कार्यकारिणी सदस्य श्रीपाद हळबे आणि प्रदीप झवेरी यांनाही समन्स बजावले आहे. या चौकशी समितीमध्ये एमसीएचे माजी सदस्य रवी मांद्रेकर यांच्यासह अविनाश राणे, दीपक ठक्कर आणि कांटवाला या तीन हायकोर्टातील वकिलांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीचे अध्यक्ष अविनाश राणे असतील.
‘‘मला चौकशीसाठी का बोलावण्यात आले हे मला माहिती नाही. मला मिळालेल्या पत्रानुसार, विश्वचषकाच्या अंतिम फेरीच्या तिकिटांबद्दल मला माहिती द्यावी लागणार आहे. त्यामुळे मी या चौकशीला उपस्थित राहणार आहे, पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अय्यर आणि झवेरी या चौकशी समितीपुढे हजर राहणार नसल्याचे समजते आहे.
अंतिम सामन्याच्या न विकलेल्या तिकिटांची किंमत जवळपास ७० लाख रुपये असल्याचे कळत असून याबद्दलची विचारणा शेट्टी यांना करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी एमसीएने शेट्टी यांच्यावर पाच वर्षांच्या निलंबनाची कारवाई केली होती.