गतविजेता भारतीय संघच आगामी विश्वचषकासाठी प्रबळ दावेदार आहे, हे सांगत असतानाच विश्वचषक आशिया खंडातच राहील, असा आत्मविश्वास मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केला आहे.
२०१५चा विश्वचषक १२ फेब्रुवारीला होणार असून त्यासाठी बुधवारपासून ५०० दिवस शिल्लक आहेत. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील संघ आगामी विश्वचषक जिंकेल आणि लागोपाठ विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज व ऑस्ट्रेलिया यांच्या यादीत भारताचाही समावेश होईल, असा विश्वास सचिनला आहे.
‘‘भारताबरोबरच पाकिस्तान आणि श्रीलंकेचे संघही दर्जेदार आहेत. या तिन्ही संघांत चांगले खेळाडू आहेत. पण त्यांच्यामध्ये भारताने चांगली कामगिरी करावी, असे मला वाटते. तुम्ही याला पक्षपातीपणाही म्हणू शकता. विश्वचषक जिंकण्यासारखी विलोभनीय आणि अविस्मरणीय गोष्ट नाही, ज्यामुळे संपूर्ण राष्ट्राला आनंद होतो,’’ असे सचिन म्हणाला.
तो पुढे म्हणाला की, माझ्याबरोबरच अब्जावधी भारतीयांची हीच इच्छा असेल की, भारताने पुन्हा एकदा विश्वचषकाला गवसणी घालावी. आपल्या संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा चांगला समन्वय आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियामध्ये खेळण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. तिथे जाऊन नेमके काय करायचे हे त्यांना पक्के ठाऊक आहे. त्याचबरोबर या वर्षांच्या सुरुवातीला न्यूझीलंडच्या दौऱ्याची आखणी केली असून त्याचा चांगलाच फायदा भारतीय संघाला होईल.
सचिनच्या दोनशेव्या कसोटीच्या स्थानासाठी आठवडय़ाचा विलंब
नवी दिल्ली : अवघ्या क्रिकेट विश्वाचे डोळे लागून राहिलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या द्विशतकीय कसोटी सामन्याचे स्थान निश्चित करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) दौरा आखणी आणि नियोजन समितीला आठवडय़ाभराचा विलंब लागणार आहे. बीसीसीआयची दौरा आखणी आणि नियोजन समितीची बैठक गुरुवारी याबाबत मुंबईत होणार होती, पण ही बैठक आठवडय़ाभरासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
सचिनची सिडनीमधील २४१ धावांची खेळी सर्वोत्तम – लारा
नवी दिल्ली : सचिन तेंडुलकरची सिडनी क्रिकेट मैदानातील २४१ धावांची खेळी सर्वोत्तम होती, असे मत वेस्ट इंडिजचा माजी महान फलंदाज आणि चॅम्पियन्स लीग स्पर्धेतील त्रिनिदाद आणि टोबॅगो संघाचे प्रशिक्षक ब्रायन लारा यांनी व्यक्त केले.‘‘ मला आठवतंय स्टीव्ह वॉ याचा तो अखेरचा सामना होता. या सामन्यात सचिनने द्विशतक पूर्ण करेपर्यंत एकही ‘कव्हर ड्राइव्ह’ खेळला नव्हता. या खेळीमध्ये सचिन हा कोणत्या दर्जाचा खेळाडू आहे, हे समजून चुकले. सचिन हा नेहमीच वेगळा खेळाडू वाटतो.’’ असे लारा म्हणाला.
आगामी विश्वचषकाचा दावेदार भारतच -सचिन
गतविजेता भारतीय संघच आगामी विश्वचषकासाठी प्रबळ दावेदार आहे, हे सांगत असतानाच विश्वचषक आशिया खंडातच राहील,
First published on: 03-10-2013 at 04:24 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World cup trophy will remain in subcontinent tendulkar