आपले शेजारील राष्ट्र श्रीलंकेत सध्या आणीबाणीची स्थिती निर्माण झालेली आहे. श्रीलंका सध्या सर्वात वाईट आर्थिक मंदीतून जात आहे. १९४८ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून ही सर्वात स्थिती आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीपासून देशात अन्न, औषधे आणि इंधनासारख्या जीवनावश्यक वस्तूंची तीव्र टंचाई जाणवत आहे. महागाईनेही विक्रमी उच्चांक गाठला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर श्रीलंकन क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर रोशन महानामा पेट्रोल पंपावर चहा वाटताना दिसला. रोशन महानामा हा १९९६ मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या श्रीलंकन क्रिकेट संघातील प्रमुख सदस्यांपैकी एक आहे.

रोशन महानामाने आपल्या ट्विटर हँडलवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तो पेट्रोल पंपाबाहेर रांगेत उभ्या असलेल्या लोकांना चहा देताना दिसत आहे. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याच्या या कृतीसाठी सोशल मीडिया युजर्स त्याचे कौतुक करत आहेत.

रोशन महानामाने शेअर केलेल्या फोटोंच्या कॅप्शनमध्ये आपल्या चहा वाटपाच्या कृतीबद्दल माहिती दिली आहे. “आम्ही कम्युनिटी मील शेअरच्या गटासोबत आज संध्याकाळी वॉर्ड प्लेस आणि विजेरामा मावठा येथील पेट्रोल पंपाबाहेर रांगेत उभ्या असलेल्या लोकांना चहा आणि बन्स दिले. दिवसेंदिवस या रांगा वाढताना दिसत आहेत. रांगामध्ये उभे राहणाऱ्या लोकांच्या आरोग्यासाठी ही गोष्ट फार घातक आहे.”

श्रीलंकन सरकार जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीसाठी डॉलर्स उभारण्यास असमर्थ आहे. आर्थिक संकटामुळे श्रीलंकेत पेट्रोल आणि डिझेलसाठीही संघर्ष सुरू आहे. पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या सर्व प्रकारामुळे राष्ट्राध्यक्ष गोताबाया यांना राजीनामा द्यावा लागला आहे. अशा स्थितीमध्ये बहुतेक श्रीलंकन खेळाडूंनी आपापल्यापरीने नागरिकांना मदत केली आहे. महानामादेखील आपल्या परिसरातील नागरिकांना मदत करत आहेत.

हेही वाचा – IND vs SA T20 Series : बंगळुरूतील निर्णायक सामन्यात पावसाची जोरदार बॅटिंग; दोन्ही संघाचे मालिका विजयाचे स्वप्न गेले वाहून

३१ मे १९६६ रोजी कोलंबो येथे जन्मलेल्या रोशन महानामाने श्रीलंकेसाठी ५२ कसोटी आणि २१३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत दोन हजार ५७६ धावा आणि एकदिवसीय सामन्यात पाच हजार १६२ धावा केल्या आहेत. यामध्ये चार कसोटी आणि तितक्याच एकदिवसीय शतकांचाही समावेश आहे. १९९९ च्या विश्वचषकानंतर रोशन महानामाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

Story img Loader