चुकांचे सातत्य राखणाऱ्या दुबळ्या भारताला जागतिक हॉकी लीगमधील पुरुषांच्या उपांत्यपूर्व फेरीत बुधवारी बलाढय़ ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या स्पर्धेत पहिले तीन क्रमांक मिळविणारे संघ पुढील वर्षी हेग येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळेच भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे. जागतिक क्रमवारीत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर असल्यामुळे या लढतीत त्यांचेच पारडे जड मानले जात आहे. आजपर्यंत कांगारूंविरुद्ध भारताची कामगिरी निराशाजनकच ठरली आहे. भारताने शेवटच्या साखळी लढतीत न्यूझीलंडला ३-३ असे बरोबरीत रोखताना आशा उंचावल्या आहेत.
भारताने पहिल्या सामन्यात आर्यलडविरुद्ध बरोबरी स्वीकारली होती, तर दुसऱ्या सामन्यात त्यांना यजमान नेदरलँड्सकडून ०-२ असा पराभव स्वीकारावा लागला होता. या पाश्र्वभूमीवर न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत त्यांनी जिद्दीने खेळ केला होता. त्यामुळेच सरदारा सिंगच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या भारताला या सामन्यात पराभव टाळता आला होता. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी खेळावर प्रभावी नियंत्रण मिळविले होते, तसेच त्यांचा बचावात्मक खेळही चांगला झाला होता. कांगारुंविरुद्ध यापेक्षाही अधिक आश्वासक खेळाची भारतीय खेळाडूंकडून अपेक्षा आहे. त्याकरिता त्यांना मधली फळी व आघाडी फळी यांच्यात चांगला समन्वय ठेवावा लागणार आहे.
भारतीय संघाचे प्रशिक्षक मायकेल नॉब्स हे स्वत: ऑस्ट्रेलियाचे असल्यामुळे त्यांना कांगारूंच्या खेळाचा सखोल अभ्यास आहे. त्यामुळेच कांगारूंमधील कच्चे दुवे हेरून हा सामना जिंकण्यासाठी ते कशी व्यूहरचना करणार याचीच उत्सुकता आहे. ऑस्ट्रेलियाने पहिला सामना गमावल्यानंतर स्पेनला ५-२ तर फ्रान्सला ७-१ असे हरविले होते. हे दोन सामने जिंकूनच त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले होते. भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा १००वा सामना आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा