एपी, बुडापेस्ट

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जागतिक जलतरण संस्थेने (फिना) तृतीयपंथी खेळाडूंसाठी नवे धोरण स्वीकारले असून याअंतर्गत वयाच्या १२व्या वर्षांपूर्वी संक्रमण केलेल्या जलतरणपटूंनाच महिलांच्या स्पर्धामध्ये सहभाग घेण्याची परवानगी असेल.

‘फिना’च्या सदस्यांनी रविवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नव्या ‘लिंग समावेश धोरणा’च्या बाजूने ७१.५ टक्के मतदान केले. त्यामुळे सोमवारपासून सर्व स्पर्धासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. २४ पानी धोरणात नव्या ‘खुल्या स्पर्धा’ श्रेणीच्या प्रस्तावाचाही समावेश आहे. ‘‘एक नवीन गट स्थापन करण्यात येणार असून तो पुढील सहा महिने ही नवीन श्रेणी कशा पद्धतीने योग्यपणे तयार करता येईल याबाबतचा आढावा घेईल,’’ असे ‘फिना’कडून सांगण्यात आले.

गेल्या गुरुवारी सायकिलगच्या जागतिक संस्थेने तृतीयपंथी खेळाडूंसाठीचे नियम अधिक कठोर करताना पात्रता नियमांत बदल केले. त्यामुळे तृतीयपंथी सायकलपटूंना स्पर्धामध्ये सहभागी होण्यापूर्वी अधिक काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. आंतरराष्ट्रीय सायकल संघटनेने (यूसीआय) टेस्टोस्टेरॉन या संप्रेरकाच्या किमान पातळीचा संक्रमणाचा काळ दोन वर्षांपर्यंत वाढवला असून कमाल स्वीकाहार्य पातळी कमी केली आहे. मागील संक्रमण कालावधी हा १२ महिन्यांचा होता, असे ‘यूसीआय’कडून सांगण्यात आले.

तीन गटांच्या सादरीकरणानंतर मतदान

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) गेल्या नोव्हेंबरमध्ये केलेल्या शिफारशींनंतर धोरण तयार करण्यासाठी एकत्र काम करत असलेल्या तीन गटांच्या (खेळाडू गट, विज्ञान व औषध गट, कायदेशीर व मानवाधिकार गट) सदस्यांच्या सादरीकरणानंतर ‘फिना’च्या सर्वसाधारण सभेत मतदान करण्यात आले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World swimming adopt new policy for transgender athletes zws